मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 07:18 AM2017-08-31T07:18:57+5:302017-08-31T07:51:07+5:30
मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे. सीएसटी ते कल्याण रेल्वे वाहतूक 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवाही पूर्वपदावर आली. पण आता पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान,टिटवाळा-सीएसटी लोकल सुरु झाल्याची माहिती मिळते आहे तसंच कसारा-आसनगाव मार्गावरही रेल्वे सुरु झाली आहे. पण टिटवाळा ते आसनगाव लोकल गेल्या 49 तासांपासून बंदच आहे.
मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली आणि पाण्याचा निचरा पूर्णत: झाल्याने काही अंशी का होईना, मुंबईकरांना दिलासा मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता, बहुतांश कार्यालयांना सुटी असल्याने, मुंबईकर अत्यंत कमी संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल सेवा कोलमडलेली असली, तरी लोकांचे हाल मात्र झाले नाहीत.
मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती.
‘कोसळधारे’त २१ जणांचे बळी तर ४० हून जास्त जखमी
अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत दोन बालकांसह १२ जणांच्या अंगावर भिंत कोसळून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाले आहेत, तर ४०हून अधिक जण जखमी आहेत.
ठाणे जिल्ह्यात ४ जण बुडाले तर चौघे बेपत्ता आहेत. पालघर जिल्ह्यात पाच जण बुडून मृत झाल्याने पावसाच्या बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे.
या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.