मध्य रेल्वे खोळंबली
By Admin | Published: November 4, 2016 05:18 AM2016-11-04T05:18:30+5:302016-11-04T05:18:30+5:30
रेल्वे रुळालगतच्या गटारामधील कचऱ्याला आग लागल्याने प्रचंड धूर झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
डोंबिवली : रेल्वे रुळालगतच्या गटारामधील कचऱ्याला आग लागल्याने प्रचंड धूर झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. धुरामुळे मार्ग दिसत नसल्याने आधीच वेग मंदावला होता. त्यात सिग्नल यंत्रणेची केबल जळाल्याच्या शक्यतेने कल्याणसह मुंबईकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. वाहतूक थांबल्याचे कारण समजत नसल्याने आणि प्रचंड धुरामुळे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले व रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेची दाणादाण उडाली.
कळवा स्थानकानजीकच्या कल्व्हर्टमध्ये (गटारामध्ये) कचरा साठलेला होता. त्यात सुका कचराही होता. त्यातील थर्माकोललने अचानक पेट घेतल्याने आग लागून ती पसरली. त्यामुळे प्रचंड धूर झाला. सुरक्षिततेच्या कारणाने स्थानकातील रेल्वे प्रशासनाने लोकल वाहतूक थांबवून धरली. सुरुवातीला दहा मिनिटे नेमके काय चालले आहे, ते समजत नव्हते. मात्र, नंतर आग, आगीचे कारण समजल्याने तातडीने वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानक प्रबंधक संजय गुप्ता यांनी दिली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यातून आग आटोक्यात आली आणि लोकल वाहतूक सुरू झाली. मात्र, त्याचा फटका वेळापत्रकाला बसला. (प्रतिनिधी)
आगीमुळे झालेल्या प्रचंड धुरामुळे कळवाजवळ लोकल सेवा विस्कळीत झाली.
रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेची उडाली दाणादाण.