उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १०० विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:01 PM2019-03-27T12:01:50+5:302019-03-27T12:02:37+5:30
मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. ..
पुणे : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे ते गोरखपुर दरम्यान ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी सायंकाळी ७.५५ वाजता पुणे स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता गोरखपुरमध्ये पोहचेल. तर प्रत्येक मंगळवारी सकाळी. ७.२५ वाजता गोरखपुर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकुण २६ फेऱ्या होतील. पुणे ते मंडुआडीह ही विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनदरम्यान प्रत्येक गुरूवारी पुण्यातून ९.३० वाजता सुटेल. तर तिसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुआडीह येथे पोहचेल. तिथून प्रत्येक शनिवारी पहाटे ४.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पुणे स्थानकात येईल.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ एप्रिल ते ५ जूलैदरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे ५.१० वाजता गोरखपुरसाठी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपुर स्थानकात पोहचेल. तर प्रत्येक शनिवारी गोरखपुर येथून दुपारी २.४० निघून दुसऱ्या दिवशी ८.२५ वाजता पुण्यात पोहचेल. मुंबई-मंडुआडीह गाडी १७ एप्रिल ते ३ जुलै दरम्यान धावेल. ही गाडी दुपारी १२.४५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडुआडीह स्थानकात दाखल होईल. तिथून सकाळी ६.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी ७.३० वाजता मुंबईत पोहचेल.