महापुरुषांचे साहित्य केंद्रीय अभ्यासक्रमात
By admin | Published: July 18, 2015 12:13 AM2015-07-18T00:13:16+5:302015-07-18T00:13:16+5:30
सीबीएसई, आयसीएसई आदी केंद्रीय विद्यालयातील अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत आणि समाजसुधारकांच्या चरित्राचा समावेश करावा, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ
मुंबई : सीबीएसई, आयसीएसई आदी केंद्रीय विद्यालयातील अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत आणि समाजसुधारकांच्या चरित्राचा समावेश करावा, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील थोर संत व समाजसेवकांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला होता. या वेळी बोलताना तावडे म्हणाले की, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांचा अभ्यासक्रम केंद्राकडून ठरतो. यात राज्य सरकार कोणताच हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु या बोर्डात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आदी महापुरुषांचे विचार कळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत व समाजसुधारकांचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मंत्री तावडे यांनी दिले. सदर महापुरुषांचे चरित्र व साहित्याच्या प्रकाशनासाठी समित्या अस्तित्वात असून, सामाजिक न्याय व शिक्षण खात्याकडून हे साहित्य प्रकाशित केले जाते. आगामी काळात डिजिटल माध्यमात सदर साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय, शासकीय मुद्रणालयात छापले जाणारे साहित्य राज्यभर वितरित करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)