केंद्राकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम - मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:33 AM2021-11-14T07:33:41+5:302021-11-14T07:34:50+5:30
केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरूंनी धर्मनिरपेक्ष देश घडविला तसेच त्यांनी लोकशाही वाचविण्याचे काम केले. नेहरूंनी समाजवादी विचार जपत गरीब व शेतकऱ्यांना त्यांचा हक्क दिला. पंडित नेहरू यांची जयंती साजरी करीत असताना, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरता कामा नये. पण देशात काही गडबड झाल्यास मोदी नेहरूंना दोष देतात. केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
बालदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सरहदी गांधी मेमोरियल सोसायटीच्यावतीने जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पंडित नेहरू आणि द आयडिया ऑफ इंडिया या चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधताना ते म्हणाले की, कंगनाचा पद्मश्री तिच्याकडून खेचून घ्यायला हवा. यासाठी राष्ट्रपतींना प्रत्येक नागरिकाने पत्र पाठविणे गरजेचे आहे. कंगनाने जे वक्तव्य केले ते संघाचे विचार आहेत. कोणी खोटे पसरवत असल्यास आपण ते खोडणे गरजेचे आहे. या चर्चासत्रात सय्यद जलालुद्दीन, भालचंद्र कांगो, फिरोज मिथीबोरवाला, हुसेन दलवाई, राम पुनियानी, अशोक कुमार पांडे यांनी सहभाग घेतला होता.