शंभराव्या नाट्य संमेलनाचा जागर ‘पुण्यात’ नाहीच; ‘बारामती’ला झुकते माप ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 07:00 AM2020-03-13T07:00:00+5:302020-03-13T07:00:05+5:30

स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार असल्याने ‘बारामती’ला झुकते माप

Centurey natya sammelan is not in an 'Pune' | शंभराव्या नाट्य संमेलनाचा जागर ‘पुण्यात’ नाहीच; ‘बारामती’ला झुकते माप ?

शंभराव्या नाट्य संमेलनाचा जागर ‘पुण्यात’ नाहीच; ‘बारामती’ला झुकते माप ?

googlenewsNext
ठळक मुद्देनाट्य संमेलन घेण्यासाठी पुणे, कोथरूड, पिंपरी-चिंचवड, दौंड, शिरूर या पाच शाखा होते उत्सुक

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा जागर राज्यातील विविध भागांत होणार असला, तरी ‘पुण्या’ला त्यातून वगळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात नाट्य संमेलन घेण्यासाठी पुणे, कोथरूड, पिंपरी-चिंचवड, दौंड, शिरूर या पाच शाखांनी उत्सुकता दर्शविली होती. मात्र, या संंमेलनाचे स्वागताध्यक्ष ‘साहेब’ असल्याने पुणे विभागात संमेलन घेण्याचा विचार करताना ‘बारामती’ला झुकते माप देण्यात आले आहे. सध्या पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला असला, तरी ‘संंमेलन’ बारामतीत घेण्याचा निर्णय अगोदरच झाला असल्याने शहरातील ‘कोरोना’ संंमेलनासाठी केवळ निमित्तमात्र ठरला आहे. 
यंदाचे शंभरावे नाट्य संमेलन एकाच ठिकाणी आयोजित न करता ते राज्यातील विविध भागांत घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतला आहे. त्यानुसार, दि. २५ मार्चपासून तंजावर येथून संंमेलनाची नांदी होणार असून, सांगली, कोल्हापूर, रायगड, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, लातूर, कल्याण, नाशिक, बारामती, विदर्भ या ठिकाणी नाट्यजागर केला जाणार आहे आणि नाट्य संमेलनाचा समारोप मुंबई येथे होईल. मात्र, या नाट्यजागरामधून ‘पुण्या’ला वगळण्यात आले आहे. शंभरावे नाट्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यासाठी पाच शाखांनी प्रस्ताव दिला होता. किमान संंमेलनाचा नाट्यजागर पुण्यात होईल, असे वाटले होते. मात्र, पुण्याला वगळून बारामतीला झुकते माप देण्यात आले आहे. २०१३मध्येच अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीला नाट्य संमेलन झाले होते. सात वर्षांनी पुन्हा  ‘बारामती’चीच  निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार असल्यानेच ‘बारामती’वर शिक्कामोर्तब केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नियामक मंडळाच्या पूर्वी झालेल्या बैठकीत शंभरावे नाट्य संमेलन  घेण्यासंबंधी जी चर्चा झाली, त्यामध्ये १०१वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्याला देण्याचे आश्वासित केल्यामुळेच प्रस्ताव दिलेल्या पाच शाखांनी फारसा पुढाकार घेतला नसल्याची दबकी चर्चाही ऐकायला मिळत आहे. एकंदर, हे संमेलनामागील ‘नाट्य’ काहीसे पुढे आल्यामुळे  पुण्यातील ‘कोरोना’ हा केवळ संमेलन न घेण्याकरिता निमित्तमात्र ठरण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. 
०००
बारामती पुणे विभागाचेच प्रतिनिधित्व करीत आहे. पहिल्यांदा एप्रिलमध्ये संमेलन होणार होते; पण ते पुण्याला शक्य नव्हते. नंतर मग बारामती शाखेने तयारी दर्शवली. म्हणून मोठ्या शहरांपेक्षा बारामतीत संमेलन व्हावे, असे ठरले. बारामतीत ते उत्सवी स्वरूपात होईल. संमेलन हे पुणे जिल्ह्यातच होत आहे. हे ठिकाण जास्त उचित आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षदेखील तिथलेच आहेत. संमेलनाची गरज ही शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. हे संमेलनाच्या हेतूला धरूनच आहे. ग्रामीण भागात ते पोहोचावे, असे सर्वांना वाटते.
- राज काझी, सदस्य, नियामक मंडळ, अ. भा. मराठी नाट्य परिषद
 

Web Title: Centurey natya sammelan is not in an 'Pune'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.