बोलक्या अर्धवटरावांची सेंच्युरी!

By Admin | Published: September 21, 2016 02:34 AM2016-09-21T02:34:53+5:302016-09-21T02:34:53+5:30

जादूगार असणाऱ्या माझ्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांची ही देणगी आहे.

Century | बोलक्या अर्धवटरावांची सेंच्युरी!

बोलक्या अर्धवटरावांची सेंच्युरी!

googlenewsNext


मुंबई : जादूगार असणाऱ्या माझ्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांची ही देणगी आहे. वडील अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग करीत. त्या वेळी जादूच्या प्रयोगातच त्यांनी शब्दभ्रमाचा खेळ दाखविण्याचे सुरू केले. त्यांनी कागदावरच १९१६
साली एका बाहुल्याचे पात्र प्रथम साकारले. त्याप्रसंगी, अर्धवटरावाचा जन्म झाला, असे सांगत जगप्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी मंगळवारी ‘अर्धवटराव’ या बोलक्या बाहुल्याच्या शंभरीनिमित्त हा प्रवास उलगडला.
मंगळवारी प्रभादेवी येथे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव : शंभरी करू जगभर साजरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी, अ‍ॅडगुरू भरत दाभोळकर, रामदास पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा पाध्ये, मुलगा परीक्षित पाध्ये, सत्यजीत पाध्ये आणि सून ऋजुता पाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी, ‘अर्धवटराव’ या बोलक्या बाहुल्याचा १००वा वाढदिवस त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसह धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, याप्रसंगी अर्धवटराव यांनी वाढदिवसाचा केक कापून उपस्थितांसोबत आनंद साजरा केला. या वेळी, ‘अर्धवटराव’ याचा शतकी प्रवास उलगडणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.
रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ यांच्यासोबतचे नाते उलगडताना अनेक वर्षांच्या रंगतदार आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘अर्धवटराव’ हे पाध्ये कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याशी असलेले नाते घट्ट आणि तितकेच संवेदनशील आहे. ‘अर्धवटरावां’च्या शंभरीनिमित्त ‘कॅरी आॅन एंटरटेन्मेंट - रामदास पाध्ये लाइव्ह’ हा नवा विशेष कार्यक्रम घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहोत.
या वेळी पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा यांनीही ‘अर्धवटराव - आवडा’ या जोडीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. त्या म्हणाल्या, अर्धवटराव हे पाध्ये कुटुंबीयांचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनी चढउतारात पाध्ये कुटुंबीयांना बळ दिले. त्यांचा शंभर वर्षांचा प्रवास उत्तरोत्तर वाढत जावो, अशी आशा व्यक्त करते. (प्रतिनिधी)
>१९१६ साली कागदावर एका पात्राच्या रूपात अर्धवटरावांचा जन्म झाला.
मंगळवारी या अर्धवटरावांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली.
‘अर्धवटराव : शंभरी करू जगभर साजरी’ या कार्यक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवस.

Web Title: Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.