तब्बल १२ वर्षांनंतर पोहचले पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, स्काउट पुरस्कारार्थींना वेगळाच अनुभव; सरकारी कामाची दिरंगाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:48 AM2021-10-24T05:48:11+5:302021-10-24T05:48:48+5:30
Certificate of Prime Minister's signature : स्काउटच्या पंतप्रधान ढाल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील विद्यालयाने सहभाग नोंदविला होता
- रमाकांत पाटील
नंदुरबार : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ऐवजी आता ‘१२ वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. जग एकीकडे गतिमान होत असताना खुद्द पंतप्रधान कार्यालयातील प्रमाणपत्राला नंदुरबार येथे पोहोचायला तब्बल १२ वर्षे लागल्याने सरकारी कामाचा वेगळाच अनुभव जिल्ह्यातील स्काउट पुरस्कारार्थींना मिळाला आहे.
स्काउटच्या पंतप्रधान ढाल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. त्यासाठी स्काउट शिक्षक नरेंद्र गुरव व २१ विद्यार्थ्यांच्या फायलीही पाठविल्या होत्या. १२ सप्टेंबर २००९ ला त्याचे परीक्षण मुंबईत झाले आणि ६ ऑक्टोबर २००९ ला त्याच्या निकालाचे पत्रही संबंधित शाळेला पाठविण्यात आले. त्यात पंतप्रधान ढाल स्पर्धेचे बक्षीस सर्वोदय विद्या मंदिरातील शिक्षकांना मिळाले होते.
हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत ४ ते ८ जानेवारी २०१२ ला होणार होता. त्याबाबतचे प्रशासनाने १३ डिसेंबर २०११ ला संबंधितांना पत्रही पाठविले होते. त्यानुसार पुरस्कारार्थींनी दिल्लीला जाण्यासाठी आरक्षणही केले. मात्र, ऐनवेळी कार्यक्रम रद्द करून तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मात्र तब्बल ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अर्थात १२ वर्षांनी ते प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची सही असून, ते दिल्लीहून ६ जानेवारी २०१२ ला पाठविल्याची तारीख आहे.
मुंबई ते नंदुरबार प्रवासासाठी लागले आठ महिने
हे प्रमाणपत्र अगोदर मुंबई येथे गेले. त्यानंतर मुंबईहून ते प्रकाशा (नंदुरबार) येथे पाठविण्यात आले. मुंबई येथून प्रमाणपत्रासोबत जे पत्र पाठविले आहे, त्या पत्रावर १० फेब्रुवारी २०२१ अशी तारीख लिहिली आहे. म्हणजे मुंबईहूनही नंदुरबारच्या प्रवासासाठीही तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लागल्याचे दिसून येते.
पत्र करिअरसाठी महत्त्वाचे ठरले असते पण...
पंतप्रधानांच्या सहीने ज्या पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे, त्यापैकी स्काउट शिक्षक वामन इंदिस यांचा कोरोनामुळे
यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक पुरस्कारार्थी शिक्षक आता निवृत्त झाले आहेत. ज्या २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी अनेकांचे आता लग्न झाले आहे. काही जण नोकरीला लागले आहेत. हे प्रमाणपत्र जर वेळीच मिळाले असते तर आयुष्याच्या करिअरसाठी ते महत्त्वाचे ठरू शकले असते. आता हे प्रमाणपत्र काय कामाचे, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.