‘डांगे अभियांत्रिकी’त ‘सेसना १५२’ विमान दाखल
By admin | Published: October 30, 2015 12:01 AM2015-10-30T00:01:22+5:302015-10-30T00:01:22+5:30
विद्यार्थ्यांकडून स्वागत : सरावासाठी विमान उपलब्ध करणारे राज्यातील पहिले महाविद्यालय
आष्टा : येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरोनॉटिकल अभियांत्रिकी विभागासाठी अमेरिकन बनावटीचे ‘सेसना १५२’ हे विमान खरेदी केल्याची माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली. विद्यार्थ्यांना सरावासाठी चालू स्थितीतील विमान उपलब्ध करून देणारे हे राज्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
प्रा. आर. ए. कनाई म्हणाले की, एरोनॉटीकल अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम सुरू करणारे डांगे महाविद्यालय हे महाराष्ट्रातील दुसरे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांचा आग्रह आहे. एरोनॉटिकल अभियांत्रिकी अद्ययावत अभ्यासक्रम असल्याने त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले आहे.
विभागप्रमुख प्रा. राममूर्ती म्हणाले की, तृतीय व अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानामध्ये असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती व्हावी यासाठीच चालू स्थितीतील विमान खरेदी केले आहे. सेसना १५२ हे विमान अमेरिकेमध्ये बनविलेले असून, एक पायलट व एक प्रवासी अशा दोन व्यक्तींसाठी विमानाचा उपयोग होतो. हे विमान बहुउद्देशीय नागरी विमान असून, आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय शैक्षणिक विमान ठरलेले आहे. हे विमान पूर्णपणे चालू स्थितीतील असून, यामधील सर्व प्रणाली चालू आहे. केवळ शैक्षणिक कारणासाठी या विमानाचा वापर होणार असल्याने त्यास उड्डाणाची परवानगी नाही. हे विमान सजीव प्रयोगशाळा म्हणून वापरता येणार आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांबरोबर मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर हे विमान ठेवण्यात आले आहे. विमानाच्या सुरक्षेसाठी हँगर बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हे विमान पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)
आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात अमेरिकन बनावटीचे ‘सेसना १५२’ हे विमान दाखल झाले आहे. यावेळी संस्थापक अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, दीपक अडसूळ उपस्थित होते.