सीईटी सोपी, कट आॅफ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:34 AM2018-05-11T04:34:39+5:302018-05-11T04:34:39+5:30
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
पुणे - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदा अभियांत्रिकीचे कट आॅफ मागील वर्षीच्या तुलनेत १० ते २० गुणांनी वाढू शकते. सीईटीची काठीण्यपातळी जेईई किंवा नीटच्या जवळपासही नसल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला.
येत्या शैक्षणिक वर्षापासून कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक आहे. त्यामुळे गुरूवारी झालेल्या सीईटीमधून तीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. या परीक्षेसाठी ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १२६० केंद्रांवर ही परीक्षा झाली. सकाळी १० ते ११.३० या वेळेत गणित, दुपारी १२.३० ते २ या वेळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत जीवशास्त्र विषयाची परीक्षा झाली. जीवशास्त्र वगळता इतर तीनही विषयांची परीक्षा सोपी गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जीवशास्त्रची परीक्षा तुलनेने कठीण होती.
पुणे विभागात
९६ टक्के उपस्थिती
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीला उपस्थिती लावली. सुमारे १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातून नोंदणी केली होती. विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४७ हजार ४०० विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राज्यातील सरकारी आणि काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात आलेली ‘एमएच-सीईटी’ गुरुवारी सुरळीत पार पडली. यंदा प्रथमच कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश या सीईटीतून दिले जाणार आहेत. मुंबईत ६० परीक्षा केंद्रांवर २० हजार ४०१ विद्यार्थी, तर उपनगरात ५७ केंद्रांवर १९ हजार २०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.