सीईटी प्रवेश परीक्षा २०२० चा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:46 PM2019-12-20T14:46:37+5:302019-12-20T14:52:20+5:30
गोंधळ टाळण्यासाठी पीसीएमबी ग्रुप वगळला
पुणे : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेणाºया एमएचटी सीईटी २०२० या प्रवेश परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच जाहीर केला जाणार आहे. मागील निकालात पर्सेंटाईलवरून झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी परीक्षेतून पीसीएमबी ग्रुप वगळला असून केवळ पीसीएम व पीसीबी या दोन ग्रुपसाठीच परीक्षा होणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाने एमएचटी सीईटी या परीक्षेची गुणदान पद्धत व अभ्यासक्रमाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार याचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल या ऑनलाईन परीक्षेच्या संभाव्य तारखा आहेत.
मागील परीक्षेचा निकाल पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला होता. या निकालानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गुण अधिक असूनही काही विद्यार्थ्यांचे पर्सेटाईल अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी आले होते. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. यावरून विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलनही केले.
पर्सेंटाईलचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला होता. पण त्यानंतरही २०२० च्या परीक्षेसाठीही पर्सेंटाईल पद्धत कायम ठेवली आहे. पण असे करताना या वेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) हा ग्रुप वगळला आहे. आता केवळ पीसीएम आणि पीसीबी हे दोन ग्रुप असतील. दोन्ही गु्रपची परीक्षा देणाºयांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांची परीक्षा त्या-त्या ग्रुपमध्ये द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांवरील या परीक्षेचा ताण वाढणार आहे. तसेचदोन्ही ग्रुपचे पर्सेंटाईल स्वतंत्रपणे नमुद केले जातील.
.......
सीईटीचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेला असेल. त्यापैकी २० टक्के म्हणजे १० प्रश्न अकरावीतील तर ८० टक्के म्हणजे ४० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातील असतील. गणित विषयाची परीक्षेत ५० प्रश्न असून, प्रत्येकी दोन गुण असतील. तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासाठी प्रत्येकी ५० प्रश्न असतील.
.........
असे असेल गुणदान
प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दोन्ही विषयांची परीक्षा १०० गुणांची राहील. जीवशास्त्रामध्ये वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्राला प्रत्येकी ५० गुण असतील. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील. तीनही विषयांसाठी प्रत्येकी ९० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. इयत्ता अकरावी अभ्यासक्रमातील सीईटीसाठीचा अभ्यासक्रमही जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेसाठी ‘निगेटिव्ह मार्किंग’ नसेल.
.........
पीसीएमबी गु्रप वगळण्यात आल्याने अन्य दोन ग्रुपसाठी स्वतंत्रपणे पर्सेंटाईल येईल. मागील वेळी पीसीएमबी ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल कमी गुण असूनही पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक होते. कारण पीसीएम गु्रपला तुलनेने अधिक विद्यार्थी असतात. विद्यार्थी संख्येच्या आधारे पर्सेंटाईल ठरत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता दोन्ही स्वतंत्र ग्रुप केल्याने हा गोंधळ होणार नाही. - हरीश बुटले, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ