भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:14 PM2023-11-29T20:14:23+5:302023-11-29T20:16:01+5:30
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणाही तंबी दिलेली नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ राईचा पर्वत करत असल्याची टीका करत भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती. यावर आता भुजबळांची प्रतिक्रिया आली आहे. विखे पाटलांना जर माझा राजीनामा हवा असेल तर त्यांनी ते त्यांच्या नेत्यांना सांगावे, असे प्रत्यूत्तर भुजबळ यांनी दिले आहे.
विखे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना जर माझा राजीनामा हवा असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणाही तंबी दिलेली नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर भुजबळ नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मी जोवर आमदार आहे तोवर नाशिकला येणार असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. इथले कार्यकर्ते मला फोन करून बोलवत होते. कांदा उत्पादक तसेच द्राक्षे उत्पादक शेतकरी यांना मदत करण्याचा विषय आज मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यांना मदत केली नाही तर ते पुढली तीन-चार वर्षे उभे राहू शकणार नाहीत, असे भुजबळ म्हणाले.
विखे पाटलांनी काय म्हटलेले...
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु, छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला होता. तसेच भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विखे पाटलांनी केली होती.