मुंबई : अल्पवयीन मुलीशी लग्न केलेल्या 53 वर्षांच्या वकिलाला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:33 AM2017-12-22T03:33:11+5:302017-12-22T03:33:47+5:30
पत्नीचे निधन झाल्यानंतर ५३ वर्षांच्या वकिलाची नजर सांगलीतल्या अल्पवयीन मुलीवर पडली. तिच्या गरिबीचा फायदा घेत या १४ वर्षांच्या मुलीसोबत त्याने लग्नाचा घाट
मुंबई : पत्नीचे निधन झाल्यानंतर ५३ वर्षांच्या वकिलाची नजर सांगलीतल्या अल्पवयीन मुलीवर पडली. तिच्या गरिबीचा फायदा घेत या १४ वर्षांच्या मुलीसोबत त्याने लग्नाचा घाट घातल्याचा प्रकार गुरुवारी मुंबईत उघडकीस आला. तिच्याशी तीन वर्षे संसार थाटल्यानंतर तिला घेऊन तो मुंबईत आला. तो बाहेर गेल्यानंतर मुलीनेच पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, बालविवाह, पॉक्सो अंतर्गत ५३ वर्षांच्या वकिलाला बेड्या ठोकल्या आहेत.
सांगलीच्या एका खेड्यात नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. आई-वडील दोघेही वृद्ध असल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. तीन वर्षांपूर्वी वकिलाच्या संपर्कात ती आली. तेव्हा तो ५० वर्षांचा होता. उच्च न्यायालयात वकिली करतो. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याचे त्याने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्याने नेहाला मागणी घातली. मात्र नेहाला हा विवाह मान्य नव्हता. तिच्या आई-वडिलांनी मात्र त्याला होकार दिला.
जून महिन्यात ते मुंबईत काळाचौकी परिसरात राहू लागले. गुरुवारी तो घराबाहेर पडल्यानंतर मुलीने थेट काळाचौकी पोलीस ठाणे गाठून आपल्या अत्याचाराला वाचा फोडली. या गुन्ह्यांत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.