कॉलेज परिसरातील ड्रग्ज तस्करांना बेड्या
By admin | Published: July 10, 2017 02:30 AM2017-07-10T02:30:13+5:302017-07-10T02:30:13+5:30
शाळा, कॉलेजचे परिसर ड्रग्ज फ्री करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री कॅम्पसची’ मोहीम सुरू केली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळा, कॉलेजचे परिसर ड्रग्ज फ्री करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री कॅम्पसची’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत त्यांनी कांदिवली, घाटकोपर, वरळी आणि वांद्रेच्या बड्या महाविद्यालयीन परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
कांदिवलीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चारकोपर परिसरातील महाविद्यालयाबाहेर केलेल्या कारवाईत, श्रीकांत महादेव लोके, फिरोज शेख, बरकतअली पठाण, मुबारक शेख या चौकडीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ११०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्या पाठोपाठ घाटकोपरच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोहम्मद परवेज शेखकडून ८०० गॅ्रमचा गांजा जप्त केला आहे. वरळीच्या पथकाने माटुंगा येथील महाविद्यालयीन परिसराबाहेरून शहनाज शेखला अटक केली. त्याच्याकडून २०० गॅ्रम गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईबरोबरच वांद्रे युनिटनेही वांद्रे पश्चिमेकडील महाविद्यालयाबाहेर छापे टाकले. या कारवाईत शबाना नोटे, फातीमा अकबर शेख उर्फ बल्लू या दोघींना अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुंबईच्या विविध शाळा, महाविद्यालयांबाहेर छापे सुरू आहेत. विद्यार्थ्यांना या अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.