मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची निवड
By admin | Published: November 6, 2014 04:16 AM2014-11-06T04:16:13+5:302014-11-06T04:16:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली.
अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली. आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून अथवा सचिव म्हणून काम न केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या कार्यालयात घेतले आहे. विशेष म्हणजे या निवडीमागे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची मोठी भूमिका राहिली आहे.
कोणते अधिकारी निवडायचे, त्यांची पार्श्वभूमी काय असे प्रश्न क्षत्रिय यांना विचारण्यात आले होते. क्षत्रिय यांनी राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्री आस्थापनेवरील सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडी करण्यातील अडथळे दूर झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री कार्यालयात कोणाला घ्यायचे यावरून मोठी खलबते झाली आणि अखेर प्रधान सचिव म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. परदेशी हे मूळ सोलापूरचे असून माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे जावई आहेत. लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. लातूरच्या भूकंपाच्या वेळी त्यांचे काम लक्षात राहीले होते. वनविभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. ई-गव्हर्नन्सबाबत आग्रही असलेले परदेशी यांचे यापूर्वीचे काम पाहून त्यांना ही संधी दिली गेली. नितीन गडकरी यांनीही परदेशींना त्यांच्या कार्यालयात घेतले होते पण राज्य सरकारने परवानगी न दिल्याने ते परत आले होते. परदेशी हे १९८५ च्या बॅचचे असून ते एम़टेक झालेले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून मिलिंद म्हैसकर काम पाहाणार आहेत. ते याआधी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मूळचे सोलापूरचे असणाऱ्या म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा या देखील आयएएस अधिकारी असून, त्या मूळच्या नागपूरच्या आहेत. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागात ते सचिव होते. ‘लोकमत’ने उघड केलेल्या जीवनदायी घोटाळ्यानंतर त्यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर देखील नेमण्यात आले होते. मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. म्हैसकर यांनी मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनीअरिंग केले आहे.
प्रवीण दराडे हे तिसरे सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत राहतील. त्या आधी ते नागपूरला अनेक वर्षे जिल्हाधिकारी, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आदी पदावर कार्यरत होते. मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या मतभेदाचा फटका त्यांना बसला व त्यांना अपारंपरिक ऊर्जा विभागात ‘नीरा’ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले होते. त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले सख्य झाले होते. दराडे हे १९९८च्या बॅचचे असून, त्यांनी एमए इकॉनॉमिक्स केलेले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदावर देखील आयएएस अधिकारी नेमला आहे. मालिनी शंकर यांची तेथे नियुक्ती केली आहे.