चैत्र वणवा संपेना...
By admin | Published: April 12, 2017 04:23 AM2017-04-12T04:23:54+5:302017-04-12T04:23:54+5:30
उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची
पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची काहिली होत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
देशात सौराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग तसेच कच्छ परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तमिळनाडूचा काही भाग, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रायलसीमा
आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात वाढ झाली आहे़
राज्यात सर्वांत जास्त विदर्भ प्रभावित झाला आहे. उपराजधानी नागपूरसह सर्व प्रमुख शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढेच आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी सन्नाटा असतो. विदर्भापाठोपाठ खान्देश, मराठवाडादेखील होरपळून निघाला आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातील पाराही चढला आहे. बागायती पट्ट्यातील सातारा, सांगलीत तापमानदेखील ४० अंशाच्या पुढे आहे
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ३९़६, अहमदनगर ४१़६, जळगाव ४१़२, कोल्हापूर ३९़५़, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४०़८, नाशिक ३९़९, सांगली ४१, सातारा ४०, सोलापूर ४१़९, मुंबई ३४, अलिबाग ३५़१, रत्नागिरी ३२़३, पणजी ३४़२, डहाणू ३३़५, उस्मानाबाद ४०़८, औरंगाबाद ३९़४, परभणी ४१़५, नांदेड ४१़५, अकोला ४१़५, अमरावती ४०़़२, बुलढाणा ३८़६, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ३९़५, नागपूर ४१, वाशिम ३८, वर्धा ४१़२, यवतमाळ ४०़
पुढील दोन दिवस तापमान वाढणार
‘‘सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात उष्णतेचे लाट आली असून या वाळंवटी प्रदेशातून येणारे ४० अंश सेल्अिस तापमान असलेले उष्ण वारे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यामुळे पुढील किमान दोन दिवस राज्यातील तापमान चढेच राहील. या वाऱ्यांची दिशा व त्या त्या ठिकाणचे भौगोलिक स्थान यानुसार तापमानात चढउतार होऊ शकतो.
- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ