स्वच्छ भारत अभियानांतर्गत चाकण नगर परिषदेचे होणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 08:13 PM2018-01-17T20:13:01+5:302018-01-17T20:14:10+5:30
स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
चाकण : स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये प्रथम टप्प्यात काही निवडक शहरांचा समावेश करण्यात आलेला होता, परंतु आता भारतातील सर्वच शहरांचा या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चाकण स्वच्छ शहर या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नुकतेच केंद्र शासनाकडून ( क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ) झालेल्या तपासणीत चाकण शहर हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
या अभियानात शहरातील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही, अशा कुटुंबीयांना शौचालयाची वैयक्तिक अथवा सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देऊन शहर हागणदारीमुक्त करणे तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016नुसार निर्मितीच्या जागी कचरा विलीनीकरण करण्याची जबाबदारी ही संबंधित कचरा निर्माणकर्त्यांची आहे.
कचरा निर्मितीच्या जागी कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करून या विभागीकृत कचऱ्यावर केंद्रित अथवा विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी चाकण नगरपरिषदने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्याचे घर व घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवून कचरा नगर परिषदेच्या घंटा गाडीतच टाकावा व शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मंगल गोरे, आरोग्य समितीचे सभापती धीरज मुटके व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.