राज्यात ३० एप्रिलला चक्का जाम
By admin | Published: April 28, 2015 01:41 AM2015-04-28T01:41:13+5:302015-04-28T01:41:13+5:30
केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी वाहतूक संघटनांनी ३० एप्रिलला चक्का जामची हाक दिली आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी वाहतूक संघटनांनी ३० एप्रिलला चक्का जामची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत राज्यातील सर्व एसटी, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक गुरूवारी बंद ठेवणार असल्याची माहिती नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स संघटनेने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशनसह वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या सहा संघटनांनी या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ शिवसेनाप्रणित वाहतूक कामगार संघटनेने अद्याप आंदोलनाबाबत पवित्रा जाहीर केलेला नाही. त्यामुळे कामगार वर्गातून रोष व्यक्त होत आहे. फेडरेशनचे निमंत्रक उदयकुमार आंबोणकर म्हणाले की, या विधेयकामुळे एसटी- बेस्टसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या संस्था कायमच्या बंद पडण्याची शक्यता आहे. शिवाय हा सर्व धंदा खाजगी मालकांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र आणि राज्य प्रशासनाला वारंवार निवेदन दिल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय शिवसेनाप्रणित परिवहन कामगार सेनेने आंदोलनात सामील होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
कसे होणार आंदोलन? देशासह राज्यातील एसटी, बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षा बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरूवारी रात्री १२ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलनात गाड्या बंद ठेवतील. एसटी, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सीशी संबंधित कोणताही कामगार यादिवशी काम करणार नाही.
कोण कोण होणार सामील? राज्यातील सव्वालाख बेस्ट कामगार, १० हजार बेस्ट कर्मचारी, ७ लाख रिक्षा चालक-मालक कामगार आणि १० हजार टॅक्सी चालक-मालक या चक्का जाम आंदोलनात सामील होतील.
किती वाहने उभी राहणार? राज्यातील ४ हजार ३०० बेस्ट बसेस,
१५ हजार एसटी, ३ लाख रिक्षा आणि सुमारे १० हजार टॅक्सी यादिवशी जागेवरच उभ्या राहतील, असा संघटनेचा दावा आहे.