चक्री पावसाने दाणादाण
By admin | Published: April 28, 2015 10:17 PM2015-04-28T22:17:31+5:302015-04-28T23:46:11+5:30
कोट्यवधींची हानी : महिलेचा जीव गेला, दोन मुले गंभीर जखमी
राजापूर : सोमवारी सायंकाळी उशिरा राजापूर तालुक्यातील सुमारे ७० ते ८० गावांना चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा प्रचंड तडाखा बसला. त्यामध्ये हसोळ मुसलमानवाडीतील एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला तर त्याच घरातील अन्य दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या तुफान वादळात सुमारे दीड हजार घरांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे चार ते पाच कोटींच्या घरात नुकसानाची आकडेवारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा तालुक्याला वादळाने दणका दिला आहे.सोमवारी दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. त्यानंतर हळुहळू ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आणि सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या वादळाला एवढा जोर होता की काही क्षणातच ते इतरत्र पसरले आणि घरे, गोठे यांची कौले, पत्रे त्यामध्ये उडून गेली. अनेक ठिकाणी घरांवर, गोठ्यांवर तसेच महत्त्वाच्या मार्गावर झाडे उन्मळून पडली.
तालुक्यातील पाचल, सौंदळ, कोंड्येतर्फे सौंदळ या महसुली गावातील पाचल येरडव, कारवली, करक आजीवली, परुळे, मूर, मिळंद, सौंदळ, रायपाटण, परटवली, ताम्हाणे, तुळसवडे, ओझर, आंगले, कोंड्येतर्फे सौंदळ, शेजवली वाल्ये, पन्हळेतर्फे सौंदळ मधीलवाडी, खालची वाडी, विलये, डोंगर, महाळुंगे, दत्तवाडी, तळगाव, मोसम, गुंजवणे, मठखुर्द, केळवली, निखरेवाडी, कोंडवशी, उन्हाळे शेढे, कणेरी पांगरे, ससाळे दोनिवडे, शेंबवणे या गावांना वादळाचा तुफानी फटका बसला. जवळपास दीड हजाराच्या आसपास घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये दोन कोटींच्या घरात नुकसानाची आकडेवारी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या वादळाने हसोळ मुसलमान वाडीतील मीर कुटुंबाचे आर्थिक नुकसान तर केलेच शिवाय घरातील कुटुंबाचा आधार असलेल्या महिलेचा बळीदेखील घेतला. सुलेमान दाऊद मीर, हे आपल्या नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने स्वत:सहित भावाच्या कुटुंबासमवेत लगतच्या घरात रहातात. सुरु झालेल्या वादळी वारा व पावसाने रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घरानजीक असलेले वडाचे झाड उन्मळून त्यांच्या घरावर पडले व त्याखाली सापडून सुलेमान मीर यांची पत्नी रुक्साना (४२) सापडून जागीच ठार झाली. घराच्या मागील दरवाजात ती उभी होती व अचानक झाड कोसळले होते. त्यावेळी सुलेमान यांचा भाऊ अकबर दाऊद मीर यांचीही दोन मुले अजमीन (१३) व अलमान (१०) हे दोघेजण त्या झाडाखाली सापडून गंभीररित्या जखमी झाले. त्या दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने रत्नागिरीच्या परकार हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित मंडळी तात्काळ घराबाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला अन्यथा आणखी मृतांची संख्या वाढली असती.
सोमवारी तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या या चक्रीवादळात केळवली, कोळंब, मोरोशी आदी गावांना जोरदार तडाखा बसला. मोरोशी बौद्धवाडीतील विजयकुमार धोंडू जाधव यांचे घरकुल योजनेतील घरावर फणसाचे झाड पडून ते जमीनदोस्त झाले. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मोरोशी टेंबवाडीमध्ये मंगेश कानडे यांच्या गोठ्यावर झाड पडून त्याखाली चार बैल सापडले. त्यापैकी एक बैल मोडला असून उर्वरित बैल सुरक्षित रािहले तर त्याच वाडीतील दीपक कानडे यांच्याही गोठ्यावर झाड पडून त्यांचे दोन बैल त्याखाली सापडले. तेदेखील सुदैवाने वाचले. केळवली गावातील काशीराम हर्याण यांचा गोठाच या वादळी पावसात जमीनदोस्त झाला. कोंडवशी गावातील जयदास चव्हाण यांचा गोठा मोडल्याने त्याखाली गाय सापडून गंभीर जखमी झाली आहे. केळवलीतील कृष्णा पवार यांच्या घरावर कलमाचे झाड कोसळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळात केळवली परिसरातील शाळांना वादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये केळवली नं. १ वरील १५०० कौले उडाली. केळवली नं. २ वरील २० पत्रे उडाले. शाळा क्र. ३ च्या रंगमंचावरील व लगतच्या अंगणवाडीवरील ६०० कौले उडाली. शाळा नं. ४ ची ६० कौले व कोने उडाले तर १० लाकडी वासे मोडले. गावातील शाळांना ७ चे ५० कोने या वादळात उडून नुकसान झाले. तशीच स्थिती मोरोशीतील शाळांमध्येही घडली. तेथील शाळा नं. १ मधील ४०० कौले, शाळा नं. २ मधील २५० कौले, मोसम नं. १ मधील ४०० कौले, २५ कोने व किचन शेड यांचे नुकसान झाले. ७ केळवली हायस्कूलचे ६० कोने या वादळात फुटून या शाळांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तालुक्याच्या विविध भागातील झालेल्या नुकसानीची माहिती प्राप्त होती होती. या वादळात तालुक्यातील आंबा बागायतदारांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक ठिकाणची हापूस कलमे या वादळात जमिनदोस्त झाल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मागील १५ दिवसात दुसऱ्यावेळी तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला.
यापूर्वी १७ एप्रिलला रायपाटण परिसराला वादळाने हादरवले होते. मागील अनेक वर्षांत झाले नाही एवढे नुकसान सोमवारच्या चक्रीवादळाने केले आहे. (प्रतिनिधी)
1सुलेमान मीर व त्यांचे कुटुंबीय पार हादरुन गेले. त्यांची मुलगी शाबीरा व मुलगा अब्रार हे तर शोकाकुल अवस्थत होते तर अकबर मीर हे आपल्या मुलांसमवेत रत्नागिरीत असल्याने गावातून मदतीसाठी धावलेल्या ग्रामस्थांनीच मीर कुटुंबाला आधार दिला.
2मंगळवारी मयत रुक्साना सलमान मीर यांचा मृतदेह हसोळ गावी आणण्याला आला व त्यांचा दफन विधी पार पडला. त्यावेळी शोकाकुल वातावरणात रुक्सानाला निरोप देण्यात आला.
ेया वादळाने मूर कोळंब आदी भागांनादेखील जोरदार तडाखा दिला. त्यामध्ये सुमारे ६० ते ७० घरांची कौले व पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कोळंबमधील न्यू इंग्लिश स्कूलवरील पत्रे उडून आतील सुमारे १८ ते १८ कॉम्प्युटरचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन ते अडीच लाखाचा फटका वादळाने या विद्यालयाला दिला. घटना घडली त्यावेळी विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली. अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
सोमवारी रात्री तालुक्याला वादळी वाऱ्यासहित पावसाने जोरदार तडाखा दिल्यानंतर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी रात्री उशीरा दुर्घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. राजापूरचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी मंगळवारी त्या भागाची पाहणी करत ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. आमदार राजन साळवीदेखील या दुर्घटनाग्रस्त भागात फिरत होते. अनेक बागायतदार, शेतकऱ्यांची भेट घेऊन आमदार साळवी यांनी त्यांना भावनिक आधार दिला.