चकवा देत मान्सून विदर्भात दाखल!
By Admin | Published: June 19, 2016 04:59 AM2016-06-19T04:59:04+5:302016-06-19T04:59:04+5:30
कधी येतो एकदाचा... असं होऊन गेलेला मान्सून चकवा देत शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. दरवर्षी नेमाने कोकणमार्गे येणाऱ्या स्वारीने यंदा मार्ग बदलला असून पूर्व विदर्भातून त्याचे आगमन
पुणे : कधी येतो एकदाचा... असं होऊन गेलेला मान्सून चकवा देत शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. दरवर्षी नेमाने कोकणमार्गे येणाऱ्या स्वारीने यंदा मार्ग बदलला असून पूर्व विदर्भातून त्याचे आगमन झाले आहे. कडक उन्हाळ्याने हैराण झालेले विदर्भवासी त्याच्या आगमनाने सुखावले असून येत्या ४८
तासांत मुंबईसह राज्यभरात तो बरसू
लागेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
यंदा मान्सून महाराष्ट्रात सर्वसाधारण तारखेपेक्षा तब्बल ११ दिवस उशिरा आला आहे. एकूणच भारतात दाखल होण्यासच त्याला उशीर झाला. १ जूनऐवजी तो ७ जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर कर्नाटकपर्यंतचा त्याचा प्रवास चांगला झाला. पण अरबी समुद्र व मध्य भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना खेचण्यासाठी कमी दाबाचे पट्टेच निर्माण होत नव्हते.
त्यामुळे राज्याच्या वेशीवर तो
थबकला होता. त्यानंतर येणार...येणार म्हणून त्याने आठवडाभर वाट पाहायला लावून घाम काढला. आता मात्र विदर्भमार्गे तो राज्यात दाखल झाला आहे. ईशान्येकडील ७ राज्यांसह पश्चिम
बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा या राज्यांमध्ये तो यापूर्वीच दाखल झाला आहे. शनिवारी छत्तीसगढमध्येही त्याचे आगमन झाले. (प्रतिनिधी)
पुढील २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात येत्या ४८ तासांत कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
मान्सून शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. यंदा नेहमीप्रमाणे कोकणमार्गे न येता विदर्भमार्गे त्याचे राज्यात आगमन झाले आहे. विदर्भाच्या पूर्व भागात दाखल झालेला मान्सून आता मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रिय होईल.
- सुनीता देवी,
संचालक, पुणे वेधशाळा