चाकरमान्यांचे हाल
By admin | Published: August 27, 2014 04:33 AM2014-08-27T04:33:58+5:302014-08-27T04:33:58+5:30
वीर ते करंजाडीदरम्यान मालगाडीचे डबे घसरून रविवारी झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवर आलेले लेटमार्कचे विघ्न अद्याप टळलेले नाही.
मुंबई : वीर ते करंजाडीदरम्यान मालगाडीचे डबे घसरून रविवारी झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवर आलेले लेटमार्कचे विघ्न अद्याप टळलेले नाही. कोकणात आणि त्यामार्गे जाणाऱ्या सर्व ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावत असून, गणेशोत्सवास जाणारे चाकरमानी लटकले आहेत.
रविवारी वीर ते करंजाडी दरम्यान डाऊनला जाणाऱ्या एका मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले होते. हे डबे बाजूला करण्यात यश आल्यावर हा मार्ग पूर्ववत होण्यास २६ तास लागले. मात्र ५०० मीटरपर्यंतच्या ट्रॅकचे मोठे नुकसान झाल्याने नवीन ट्रॅक व स्लीपर्स टाकण्याचे काम मंगळवारपर्यंत सुरूच होते. त्याचा परिणाम कोकण मार्गावरून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर झाला. ट्रॅकचे काम पूर्ण होण्यास बुधवार उजाडणार असल्याने या दिवशीही प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.