Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:39 AM2019-11-01T02:39:53+5:302019-11-01T13:29:24+5:30
यादी तयार करण्याचे काम सुरू
यदु जोशी
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी या बाबत गुरुवारी चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जातीय, प्रादेशिक संतुलन साधण्याबरोबरच नव्या-जुन्या चेहऱ्यांचा मेळ साधण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे.
पंकजा मुंडे, राम शिंदे, डॉ.अनिल बोंडे हे तीन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले आणि विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील ग्रामविकास, महिला व बालकल्याण, कृषी, जलसंधारण, ऊर्जा व उत्पादन शुल्क अशी महत्त्वाची खाती अन्य मंत्र्यांना दिली जाऊ शकतात. विद्यमान मंत्र्यांपैकी तीन ते चार जणांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास भाजपमध्ये मोठा वाव असेल.
गेल्या मंत्रिमंडळात विदर्भातून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भातून भाजपचे ४४ आमदार निवडून आले होते. यावेळी ही संख्या २९ वर घसरली. त्यामुळे मंत्रिमंडळात पूर्वीइतका विदर्भाचा बोलबाला नसेल, असे म्हटले जाते. त्या उलट मुंबईसह कोकणातील भाजपचे संख्याबळ २६ वरून २७ गेले. त्यामुळे या भागाला वाढीव प्रतिनिधीत्व मिळू शकते. कोल्हापूर, पालघर आदी जिल्हे भाजपमुक्त झाल्याने तेथे कोणाला संधी मिळण्याची शक्यता नाही. अमरावती, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली. ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्या जळगाव व उत्तर महाराष्ट्रात २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती झाली नाही. संख्याबळ सहावरुन चारवर आले. धुळे, नंदुरबार, बुलडाण्याला स्कोअर सुधारता आला नाही. तेथील जयपराजयाचे विश्लेषण करण्यात आले असून त्यानुसार तेथील मंत्रिपदांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
तथापि, चांगले यश देणाºया जिल्ह्यांना चांगली मंत्रिपदे मिळू शकतात. त्यात मुंबई, ठाणे, अकोला, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नाशिक शहर, सातारा, सोलापूर जिल्हा आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील पक्षातील काही नेत्यांशी सल्लामसलत करून एक यादी तयार करतील आणि पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
यावेळी मंत्रिमंडळात चांगली टीम देण्याचा प्रयत्न
‘लॅक ऑफ टॅलेंट’चा आक्षेप फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाबाबत सातत्याने घेतला गेला. दोनचार मंत्री सोडले तर मंत्रिपदाचा आवाका असलेले लोकच नाहीत असे म्हटले गेले. यावेळी हा आक्षेप दूर करुन चांगली टीम देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असेल.
आवाका नसला तरी काही चेहºयांना जातीपातींचा विचार करुन घेतले जाते. यावेळीही तसा विचार झाला तर योग्यतेचा निकष काहींबाबत बाजूला ठेवला जावू शकेल.
पहिल्या मंत्रिमंडळाचा चेहरा ‘ टीम देवेंद्र’ असा नव्हता. वेगवेगळ्या समीकरणांतून मंत्रिपदे दिली गेली. यावेळी ‘टीम देवेंद्र’चे सदस्य म्हणून ओळखले जाणारे काही चेहरे निश्चितच असतील, असे मानले जाते.