सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे आव्हान

By admin | Published: July 13, 2017 03:24 AM2017-07-13T03:24:37+5:302017-07-13T03:24:37+5:30

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणाच नाही

Challenge of building a competent, fire-fighting machinery | सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे आव्हान

सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे आव्हान

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणाच नाही. नगरपालिकेचे जुने केंद्र, सिडको व एमआयडीसीचे केंद्र आहे; परंतु मोठी आग लागल्यास किंवा २० ते २२ मजली टॉवरला आग लागल्यास ती विझविण्यासाठी ही यंत्रणा पुरेसी नाही. यामुळे मोठी आग लागल्यास पूर्णपणे नवी मुंबईसह सिडकोच्या विद्यमान यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागत आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर निवडणुकांचे सोपस्कार पूर्ण झाले. महापौर, उपमहापौरांची निवडही झाली असून, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. विद्यमान सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि प्रशासनासमोर सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्याचे आव्हान उभे आहे. मनपा क्षेत्राच्या प्रमुख समस्यांमध्ये अग्निशमन यंत्रणेचाही समावेश आहे. पूर्वीची नगरपालिका, गावठाण, सिडको विकसित नोड व एमआयडीसी अशा चार टप्प्यांमध्ये महापालिकेची विभागणी होत आहे. सद्यस्थितीमध्ये पूर्ण मनपाक्षेत्रामध्ये मोठी आग लागल्यास ती विझविण्याची यंत्रणा येथील मनपाची यंत्रणा, सिडको व एमआयडीसीच्या केंद्रांमध्ये नाहीच. सिडकोने या परिसराचा विकास करताना २० ते २२ माळ्यांंच्या इमारतींनाही परवानगी दिली; परंतु या इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली नाही. एमआयडीसीच्या केंद्राचीही दुरवस्था झाली असून, कारखान्यांना आग लागल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीची यंत्रणा सक्षम करण्याकडे त्यांचे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. नगरपालिकेची यंत्रणा महापालिकेकडे हस्तांतर झाली आहे. मुख्यालयासमोर अग्निशमन केंद्राची इमारतही उभारण्यात आली आहे; परंतु या केंद्रामध्ये प्रशिक्षित अग्निशमन जवानांची कमतरता आहे. किरकोळ आग विझविणे, पक्षी अडकल्यास सोडविणे व इतर कामेच केली जात आहेत.
सद्यस्थितीमध्ये सिडकोची खारघर, कळंबोली व नवीन पनवेलमध्ये अग्निशमन केंद्र आहेत. महापालिका क्षेत्राची पूर्ण जबाबदारी या तीन केंद्रांवरच अवलंबून आहे; पण मोठी आग लागल्यास ती विझविण्यासाठी त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. भविष्यात मोठी आग लागल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांप्रमाणेच अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात सिडकोची अग्निशमन यंत्रणाही महापालिकेकडे हस्तांतर केली जाणार आहे; पण तोपर्यंत सिडकोने या यंत्रणेला सक्षम करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक व आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिका स्थापन झाली असल्याने सिडकोने त्यांच्या अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनाने अग्निशमन विभाग सक्षम करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत जानकार व्यक्त करत आहेत.
खारघर सेक्टर-८मधील भूमी हाइट्स इमारतीला बुधवारी दुपारी १२.३० वाजता आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर मीटर रूममधील वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. या परिसरामध्ये राहात असलेले रहिवासी रामचंद्र देवरे यांनी याविषयी खारघर अग्निशमन दलाला माहिती दिली. खारघर व नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविली. तळमजल्यावर लागलेली आग १३व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. इमारतीमधून निघालेल्या धुराच्या लोटामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता. सिडको अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी ए. पी. मानके व पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
>एमआयडीसीची सुरक्षाही धोक्यात : तळोजा एमआयडीसीमध्ये जवळपास ९७० कारखाने आहेत.
८६३ हेक्टर जमिनीवर एमआयडीसी वसली असून, सव्वालाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. एमआयडीसीच्या एकमेव अग्निशमन केंद्राचीही दुरवस्था झाली असून, तेथे पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नाही.
सक्षम यंत्रणा होती
पनवेल नगरपालिकेने १८८४मध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू केली होती. मुंबईबाहेरील ही पहिली अग्निशमन यंत्रणा होती. या अग्निशमन दलाने शहरातील मेघजी मनजी यांच्या घराला लागलेली आग विझविली होती.
तक्का, पुराणिक बंगला, परस्पा मिल व इतर ठिकाणी लागलेल्या आगी विझविल्याची नोंद आहे. १९४६मध्ये १५०० रूपये खर्च करून नवीन फायर इंजिन घेतल्याची नोंद आहे. कर्जतमध्ये लागलेली आगही पनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या
साहाय्याने विझविली होती. १३० वर्षांपूर्वी अद्ययावत यंत्रणा असलेल्या
पनवेलची अग्निशमन
यंत्रणा सद्यस्थितीमध्ये मागासलेली असून ती सक्षम करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

Web Title: Challenge of building a competent, fire-fighting machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.