अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८ लाख पेपर तपासण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:02 AM2017-07-20T05:02:03+5:302017-07-20T05:02:03+5:30
राज्याचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैपूर्वी मुंबई विद्यापीठाला सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. राज्यपालांच्या तंबीनंतरही
- पूजा दामले । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैपूर्वी मुंबई विद्यापीठाला सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. राज्यपालांच्या तंबीनंतरही दिलेल्या वेळेत निकाल जाहीर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. सध्याची स्थिती पाहता १२ दिवसांत ८ लाख पेपर तपासणी अशक्य असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठात यंदा राबवण्यात आलेली आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया नापास झाल्याचेच यामुळे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दीड महिन्यात १७ लाख उत्तरपत्रिकांपैकी सुमारे नऊ लाख उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. आता ३१ जुलैची डेडलाइन पाळण्यासाठी प्राध्यापकांसमोर १२ दिवसांत तब्बल ८ लाख उत्तरपत्रिका तपासणीचे आव्हान आहे.
एप्रिल महिन्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी निकालाला होणारी दिरंगाई, प्रकियेत होणारे गडबड-गोंधळ टाळण्यासाठी सर्व शाखांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन करण्याचे जाहीर केले. यंदा निकाल लवकर जाहीर होणार अशी आशा विद्यार्थ्यांच्या मनात पल्लवित झाली होती. मात्र पूर्वाभ्यास न करता ही योजना राबविल्याने संपूर्ण पेपर तपासणीचा बोजवारा उडाला असून निकालही अभूतपूर्व रेंगाळला आहे.
वास्तविक, पेपर तपासणीच्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही आलेल्या कंपन्यांपैकीच ‘मेरीट ट्रॅक’ कंपनीला कंत्राट दिले गेले. ४ मेपासून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात होणार होती. पण, उत्तरपत्रिका स्कॅनिंग पूर्ण न झाल्याने अन्य तांत्रिक अडचणींमुळे तपासणीची प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाली. आॅफलाइन उत्तरपत्रिका तपासणीपेक्षा यंदा उत्तरपत्रिका तपासणीच्या मुहूर्ताला तब्बल दोन महिन्यांचा लेटमार्क लागला. त्यानंतरही जून अखेरपर्यंत निकाल जाहीर होतील, असा विश्वास व्यक्त करत कुलगुरूंनी प्रक्रिया राबवण्यास प्राचार्य आणि प्राध्यापकांना प्रोत्साहन दिले. आॅनलाइन प्रक्रियेचा पुरेसा अभ्यास न केल्याने अनेक समस्या उद्भवत असल्याने प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणे कठीण झाले आहे. त्यामुळे दीड महिना उलटूनही आत्तापर्यंत १७पैकी ९ लाख उत्तरपत्रिकाच तपासण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिवसाला २५ ते २६ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी होते. तर, तितक्याच उत्तरपत्रिकांचे ‘मॉडरेशन’देखील होते. या वेगाने पुढच्या १२ दिवसांत ३ लाख उत्तरपत्रिकाच तपासून होऊ शकतात. दोन ते तीन दिवसांपूर्वीच ‘मॉडरेशन’देखील सुरू केले आहे. ७ ते ८ लाख उत्तरपत्रिका मॉडरेशनला आल्यास अजून किती वेळ लागेल? याचे गणित मांडता येणार नसल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
अजूनही या प्रक्रियेत अनेक अडचणी आहेत. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका दिसत नाहीत. एकेक पान लोड होण्यासही वेळ लागतो. या समस्यांमुळे सगळीच प्रक्रिया रेंगाळली आहे. पण, यापुढे गुण एकत्र करून निकाल लावताना आॅनलाइन येणाऱ्या समस्यांविषयी विद्यापीठ अंधारातच आहे. एकूण उत्तरपत्रिका तपासणीचा वेग आणि येणाऱ्या अडचणींमुळे जुलै अखेरपर्यंत निकाल लावणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यार्थ्यांची चिंता कायम!
राज्यासह राज्याबाहेरील अन्य विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. काही विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया संपल्या आहेत. तरीही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे पदवीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे आता वर्ष वाया जाते की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.
मॉडरेशनचे
आव्हान मोठे!
मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार, जे विद्यार्थी नापास झाले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना ६०पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत आणि उर्वरित उत्तरपत्रिकांपैकी कोणत्याही ५% उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन केले जाते.
कला शाखेत ६० गुणांच्या उत्तरपत्रिका तुलनेने कमी असतात. पण, अन्य शाखांमध्ये ६०पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते.
त्यामुळे आता १७ लाखांपैकी ७ ते ८ लाख उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करावे लागणार आहे. निकालाची प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने इतक्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करणे ही प्राध्यापकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.