मीटर रिकॅलिब्रेशनचे आव्हान
By admin | Published: May 13, 2015 01:58 AM2015-05-13T01:58:09+5:302015-05-13T01:58:09+5:30
रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन
मुंबई : रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये भाडेबदल) होत नाही, तोपर्यंत ही भाडेवाढ लागू होणे अशक्य आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, उल्हासनगरसह अन्य एमएमआरडीए क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख रिक्षा-टॅक्सी असून, अवघे १९ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी आरटीओला मिळत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ हकिम समितीच्या शिफारसीनुसार केली जात असून, २७ जुलै २0१२ रोजी ही शिफारस लागू करण्यात आली. त्यानंतर याच समितीच्या शिफारसीनुसार आतापर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. एमएमआरडीएने आता रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात १ जूनपासून १ रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रिक्षाचे भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होईल. मात्र त्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे गरजेचे असल्याचे आरटीओ अधिकारी सांगतात.
जोपर्यंत मीटरमध्ये नवीन भाड्यासाठी बदल केला जात नाही, तोपर्यंत नवीन भाडे रिक्षा-टॅक्सीचालक आकारू शकत नाहीत. त्यामुळे रिकॅलिब्रेशन होणे गरजेचे असून, तेच मोठे आव्हान असल्याचे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एमएमआरडीए क्षेत्रात सध्या रिक्षा-टॅक्सींची संख्या ही जवळपास साडेतीन लाख एवढी आहे. तर रिकॅलिब्रेशनसाठी हातात १९ दिवस शिल्लक असून, या दिवसांत मीटरमध्ये बदल करून १ जूनपासून नवीन भाड्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
आता दोन दिवसांत हायकोर्टात भाडेवाढीची माहिती दिल्यानंतर सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत रिकॅलिब्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी नियोजन केले जाईल. त्यानंतर यासंदर्भात सर्व रिक्षा-टॅक्सी संघटनांसमवेतही बैठक घेण्यात येईल आणि चालकांकडून रिकॅलिब्रेशन करण्यासाठी त्वरित प्रतिसाद मिळावा यावर नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. साधारण ४५ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी लागणार असले तरी त्यापेक्षा जास्त दिवसही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.