भाजपाच्या ‘मिशन-१२५’समोर ‘नाराजी’चे आव्हान

By admin | Published: January 10, 2017 07:33 PM2017-01-10T19:33:28+5:302017-01-10T19:33:28+5:30

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे. इच्छुकांच्या संख्येनेदेखील विक्रम केला आहे.

Challenge of 'Narrati' before BJP's 'Mission-125' | भाजपाच्या ‘मिशन-१२५’समोर ‘नाराजी’चे आव्हान

भाजपाच्या ‘मिशन-१२५’समोर ‘नाराजी’चे आव्हान

Next
>- योगेश पांडे 
नागपूर, दि. 10 - आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे. इच्छुकांच्या संख्येनेदेखील विक्रम केला आहे. मात्र काही प्रभागांमध्ये पार्टी कार्यकर्त्यांमध्ये प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे केवळ नाव नको तर काम लक्षात घेऊन तिकीट देण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात मागणी होत आहे. तिकीटवाटपानंतर कार्यकर्त्यांनी ‘नाराजी’चे अस्त्र उगारु नये यासाठी पार्टीतील धुरिण विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
सध्या भाजपाच्या तिकीटासाठी पार्टी कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. यंदा ३ हजार १० जणांनी तिकीटासाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. खासदार, आमदार व ज्येष्ठ पदाधिका-यांच्या माध्यमातून उमेदवारांची चाळणी सुरू आहे. 
प्रत्येक वेळी तिकीटांसाठी आजी-माजी नगरसेवकांसोबतच कार्यकर्तेदेखील इच्छुक असतातच. त्यामुळेच तिकीट मिळणार नाही, हे माहिती असूनदेखील ते अर्ज करतात. तिकीट वाटप जाहीर झाल्यावर सर्व पक्षासाठीच प्रचार करतात. मात्र यंदा शहरातील काही प्रभागात प्रस्थापितांविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच प्रभागात चांगले नाव असलेल्या ज्येष्ठ पदाधिका-यांनीदेखील गंभीरतेने तिकीटांसाठी दावेदारी केली आहे. 
अशा स्थितीत तिकीट वाटपानंतर अपेक्षितांना उमेदवारी मिळाली नाही, तर कार्यकर्ते नाराज होऊ शकतात व याचा फटका प्रचाराला बसू शकतो, ही बाब पार्टीचे नेते जाणून आहेत. त्यामुळेच तिकीट कुणालाही मिळाले तरी पार्टीहिताला प्राधान्य देण्यात यावे असे, मुलाखतींना येणा-या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात येत आहे 
 
जिंकणार कोण, सर्वेक्षण की शिफारस ? 
पार्टीचे अंतर्गत राजकारण लक्षात घेता अनेकांना शहरातील मोठ्या नेत्यांनी तुम्हालाच उमेदवारी मिळेल असे तोंडी आश्वासन दिले आहे. अनेक इच्छुक तसा दावादेखील करत आहेत. दुसरीकडे पार्टीतर्फे सर्व प्रभागांत सर्वेक्षणदेखील करण्यात आले होते. त्यात आघाडीवर नावे येणा-यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे पार्टीनेत्यांनी छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे सर्वेक्षणाला झुकते माप मिळते की शिफारस बाजी मारते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘ऑल इज वेल’ असल्याचा पार्टीचे पदाधिकारी दावा करत असले तरी अनेक मोठ्या प्रभागातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धुसफूस त्यांना माहिती आहे. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’ची वेळ येऊ नये यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
 
पार्टीच्या उमेदवाराला सर्वांचाच पाठिंबा : कोहळे 
तिकीटासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येतातच. यंदा ३ हजारांहून अधिक इच्छुकांतून उमेदवारांची निवड करायची आहे. एकाच प्रभागातून १० हून अधिक ज्येष्ठ व दिग्गज नावे असल्याचेदेखील दिसून येत आहे हे खरे आहे. मात्र व्यक्ती नव्हे तर आम्ही पार्टीला जास्त महत्त्व देतो व कार्यकर्त्यांचीदेखील हीच विचारसरणी आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व प्रभागात सर्व इच्छुकांना एकत्रितपणे घेऊन दोनदा जनसंपर्क केला आहे. त्यामुळे जर यदाकदाचित कुणी नाराज झालाच तर तो तिस-यांना पक्षाच्या विरोधात प्रचारास धजावणार नाही. तशी अशी आम्ही अगोदरच व्यवस्था केली आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असा दावा शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला. 

Web Title: Challenge of 'Narrati' before BJP's 'Mission-125'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.