आघाडीला रोखण्याचे विरोधी पक्षांना आव्हान
By admin | Published: November 19, 2016 03:06 AM2016-11-19T03:06:55+5:302016-11-19T03:06:55+5:30
राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा नगरपरिषदेची निवडणूक राजकीय नेत्यांच्या उत्सुकतेबरोबरच ‘तटकरे’या राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेची बनली आहे.
जयंत धुळप,
अलिबाग- गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा नगरपरिषदेची निवडणूक राजकीय नेत्यांच्या उत्सुकतेबरोबरच ‘तटकरे’या राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेची बनली आहे. आ. सुनील तटकरे यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे आ. अनिल तटकरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचेच श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे यांचे कनिष्ठ बंधू संदीप अनिल तटकरे यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी रोहा नगरपरिषद यावर्षी ‘राजकीय भाऊबंदकी आणि काका-पुतण्यांचे राजकीय द्वंद’याने गाजणार हे स्पष्ट झाले.
पुतण्यानेच घरातील निष्ठा झुगारून शिवसेनेतून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणे हे रोहेकर मतदारांना आश्चर्यांचे वाटत आहे. मात्र, त्याच वेळी तटकरे राजकीय घराण्यातील संदीप अनिल तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणे, हे शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अंनत गिते यांचे यश म्हणायचे की तटकरे यांची सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्याकरिताची कुशल राजकीय खेळी म्हणायची याचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. संदीप तटकरे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांना मात्र हा निर्णय काहीसा रुचलेला नाही; परंतु पक्ष शिस्त म्हणून ते याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत. आ.सुनील तटकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व रोहा नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांनाच थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी पुन्हा मिळणार, असे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि शेडगे यांचे समर्थक असतानाच, रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-काँग्रेस या आघाडीचे थेट नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले व्याही संतोष पोटफोडे यांची उमेदवारी आ.सुनील तटकरे यांनी जाहीर केली आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना मोठा धक्काच बसला आणि अखेर विद्यमान नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे आपल्या निष्ठावंतांच्या पाठबळावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले.
शिवसेना-भाजपाच्या युतीचे सुत रोह्यात जमले नाही. भाजपा उमेदवार निवड समितीच्या अहवालांती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी रोह्यात भाजपाचे थेट नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार म्हणून मोतिलाल जैन यांची उमदेवारी जाहीर केली. या उमेदवारीतून रोह्यात भाजपा पक्ष अस्तित्व सिद्ध करून भाजपाची राजकीय प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याची संधी येथे घेतली आहे; परंतु त्याचे यशापयश निवडणुकीच्या निकालांतीच स्पष्ट होणार आहे. रोह्याचे माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह हे अपक्ष उमेदवार, तर बहुजन मुक्ती पार्टीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल गजगे नगराध्यक्षपदाकरिता रिंगणात आहेत.
>प्रचार खुला की छुपा : रोहा नगराध्यक्षपदाकरिता खरी लढत आघाडीचे संतोष पोटफोडे, अपक्ष समीर शेडगे, शिवसेनेचे संदीप अनिल तटकरे अशी तिरंगीच होणार असे जाणकारांचे मत आहे; परंतु त्याच वेळी आ. सुनील तटकरे यांचे बंधू राष्ट्रवादीचे आ.अनिल तटकरे आणि पुतणे राष्ट्रवादीचेच श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे हे आ.सुनील तटकरे यांच्याविरोधात उघडपणे आणि शिवसेना उमेदवार समीर तटकरे यांच्या समर्थनार्थ उघडपणे प्रचार करू शकणार नाहीत.