गोव्याच्या पर्यटनासमोर उपद्रवी घटकांचे आव्हान
By admin | Published: April 8, 2017 11:25 PM2017-04-08T23:25:08+5:302017-04-08T23:25:08+5:30
छोटे विक्रेते, ड्रग्स व्यावसायिक, लमाणी, काही संशयास्पद शॅक व्यावसायिक, दलाल, तसेच मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश संगीताच्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त
- सद्गुरू पाटील, पणजी
छोटे विक्रेते, ड्रग्स व्यावसायिक, लमाणी, काही संशयास्पद शॅक व्यावसायिक, दलाल, तसेच मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश संगीताच्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान गोव्यातील पर्यटन व्यवसायासमोर आहे.
गोव्याला वार्षिक सरासरी ६० लाख पर्यटक भेट देतात. १० वर्षांपूर्वी हे प्रमाण केवळ २५ लाख असायचे. गोव्याचे नाव खराब करणारे उपद्रवी घटकही वाढत चालले आहेत. एका आयरिश युवतीचा अलीकडेच गोव्यात खून झाल्यानंतर, शासकीय यंत्रणेने पर्यटन व्यवसायातील उपद्रवी घटकांकडे मोर्चा वळविला
आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा
वापर होतो, अशा तक्रारीही वाढत आहेत.
खाण व्यवसायानंतर पर्यटन आणि मद्य हे गोव्याचे मोठे व्यवसाय. खाण व्यवसायाला उतरती कळा लागली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मद्य व्यवसायालाही दणका बसला. सुमारे ३ हजार मद्यालये गोव्यात अडचणीत आली. मद्य व्यवसायाचा पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध येतो. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पर्यटन हा प्रदूषण नसलेला चांगला व्यवसाय. आम्हाला या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवायची आहे. मात्र, किनाऱ्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांना काही घटक खूपच उपद्रव करतात. ते आम्हाला थांबवायचे आहे. ड्रग्स व्यवसायाने गोव्याच्या पर्यटनाला विळखा घातला आहे. तो सोडवून ड्रग्स व्यावसायिकांना नेस्तनाबूत करणे हे आम्ही लक्ष्य बनविले आहे.
किनारपट्टीवर छोट्या वस्तू विकण्याच्या बहाण्याने काही विक्रेते चरस, गांजा वगैरे विकतात. काही शॅक्स तथा पर्यटन गाळ््यांमध्येही संशयास्पद व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तेही आता बंद केले जातील. कडक कारवाईसाठी सरकारने कृती योजना तयार केली आहे, असे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.
कर्नाटकच्या मंत्र्यांची टीका
कर्नाटकचे पर्यटनमंत्री प्रियांक खर्गे यांनी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांवर टीका केली आहे. गोव्यात स्थायिक लमाणी जमात ही मूळ कर्नाटकमधील आहे. त्यांचा संबंध गैरधंद्यांशी येत नाही. त्यामुळे त्यांना गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी दोष देऊ नये, असे खर्गे यांनी म्हटले आहे. अमली पदार्थ व्यवसायाशी लमाण्यांचा संबंध आहे, असे गोवा सरकारने म्हणण्यापूर्वी पुरावे सादर करावेत, असे आव्हान खर्गे यांनी दिले आहे.