मोदींपुढे काँग्रेस नव्हे, आरएसएसचे आव्हान

By admin | Published: January 9, 2015 12:52 AM2015-01-09T00:52:37+5:302015-01-09T00:52:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे काँग्रेसचे कुठलेही आव्हान नाही. त्यांच्यापुढे कोणते आव्हान असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा. तर, काँग्रेसपुढे बाहेरील कुण्या

The challenge of the RSS, not the Congress, but the RSS | मोदींपुढे काँग्रेस नव्हे, आरएसएसचे आव्हान

मोदींपुढे काँग्रेस नव्हे, आरएसएसचे आव्हान

Next

काँग्रेसच्या शुद्धिकरणाची गरज : काँग्रेसने आंदोलन व संघर्षाचे राजकारण सोडले
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे काँग्रेसचे कुठलेही आव्हान नाही. त्यांच्यापुढे कोणते आव्हान असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा. तर, काँग्रेसपुढे बाहेरील कुण्या व्यक्तीचे आव्हान नसून पक्षातील त्या लोकांचे आव्हान आहे, ज्यांनी ‘आम आदमी’ला काँग्रेसपासून दूर करण्याचे काम केले आहे, असे रोखठोक मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. सत्यव्रत चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
नागपूर भेटीदरम्यान ‘लोकमत’शी चर्चा करताना खा. सत्यव्रत चतुर्वेदी यांनी काँग्रेस, संघ व मोदी या विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले. चतुर्वेदी म्हणाले, काँग्रेस अजूनही कोमातून बाहेर येण्याच्या प्रक्रियेत आहे. काँग्रेस मोदींसाठी आव्हान ठरण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र मोदींसाठी मोठे आव्हान आहे. कारण, संघाने अपरिहार्यतेमुळे मोदींना स्वीकारले आहे. मोदी विजय मिळवून देऊ शकतात, असे संघाने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात समोर आल्यानंतर संघाने त्यांना स्वीकारले. मोदींसमोर दुसरे आव्हान आहे ते त्यांनी नागरिकांना दाखविलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे. जे लहरीत जिंकून येतात त्यांचा ग्राफ घसरायलाही अधिक वेळ लागत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
आता काँग्रेसचे भविष्य काय, या प्रश्नावर ते म्हणाले, जेव्हापासून काँग्रेसने चारित्रिक परिवर्तन केले तेव्हापासूनच प्रश्न निर्माण झाले. काँग्रेस पारंपरिकरीत्या भांडवलवादाच्या विरोधात व गरीब तसेच शेतकऱ्यांची समर्थक राहिली आहे. आता कोण शेतकऱ्यांबाबत बोलत आहे ? आता तर संपन्न वर्गाची चर्चा केली जाते. पूर्वी वरिष्ठ वर्गात ब्राह्मण, मध्यम वर्गात मुस्लिम व मागास वर्गातील दलित काँग्रेसच्या सोबत असायचे. आता हे तिघेही दुसऱ्या पक्षांसोबत गेले. काँग्रेसकडे काय शिल्लक राहिले? काँग्रेसने आंदोलन व संघर्षाचे राजकारण सोडून दिले. सत्तेचे राजकारण होऊ लागले व त्यात संबंधित वर्ग दूर होत गेला. यापूर्वी काँग्रेसने सत्तेत असतानाही आंदोलने केली आहेत. आता आपण सोयीस्कर राजकारण करू लागलो आहोत, असा कटाक्षही त्यांनी नोंदविला.
चतुर्वेदी म्हणाले, सत्तरच्या दशकात स्वतंत्र पार्टी नावाचा पक्ष उदयास आला होता. पिलू मोदी त्याचे अध्यक्ष होते. सर्व राजेरजवाडे यात सहभागी झाले होते. १९७१ च्या निवडणुकीत तो पक्ष हरला. मात्र, यातून लागलीच धडा घेत त्यांनी पक्ष भंग केला.
या पक्षात गेलेले राजेरजवाडे मागच्या दाराने काँग्रेसमध्ये परत आले. त्यांना वाटले की काँग्रेसला समोरून कुणी हरवू शकत नाही, त्यामुळे या पक्षात शिरून त्याला संपविणे सोयीचे होईल. सध्याचे काँग्रेसचे चित्र पहा, विविध प्रदेशात काँग्रेसला कोण लीड करीत आहेत ? काश्मीर, पंजाब, हिमाचल, मध्य प्रदेशचे उदाहरण पहा. या सर्व परिस्थितीमुळे आपल्यासाठी आंदोलन करणारी काँग्रेस आता राहिली नाही, असा विचार लोक करू लागले आहेत, असे मत त्यांनी मांडले.(प्रतिनिधी)
१९५० चे कार्यक्रम कसे चालणार ?
काँग्रेसने १९५० मध्ये विविध वर्गासाठी काही कार्यक्रम तयार केले होते. त्या १९५० च्या कार्यक्रमांचा एकदा तरी आढावा घेण्यात आला आहे का? पिढ्या बदलल्या, विचार बदलले, संगणकाचे युग आले व काँग्रेसी मात्र त्याच कार्यक्रमासाठी फिरत आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य असताना आपण तीनदा हा मुद्दा उचलला. आपण १९५० च्या मॉडेलची गाडी विकत आहोत, ती कोण खरेदी करणार? एक समिती बनविण्यात आली, तिचे पुढे काय झाले? माझ्या मते काँग्रेसच मोदींची मदतगार ठरली आहे. मोदी जिंकले नाहीत, तर जनतेने काँग्रेसला हरविले आहे. ‘नो मोर काँग्रेस’ हे जनतेने ठरविले होते. त्यामुळे कुणाला निवडून द्यायचे, असा प्रश्न होता. मोदींनी स्वत:ला एक चांगला पर्याय म्हणून लोकांसमोर सादर केले, असेही ते म्हणाले.
संधिसाधूंचा काँग्रेसवर ताबा
काँग्रेसमध्ये प्रतिभासंपन्न लोक आहेत. मात्र, ते उपेक्षित राहिले असून काही संधिसाधूंनी काँग्रेसला आपल्या हातात घेतले आहे. संपूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात आहे. आता काँग्रेस १९७७ प्रमाणे स्वत:चे शुद्धिकरण करू शकेल का, हे काँग्रेस समोरील मोठे आव्हान आहे. त्यावेळी इंदिराजी होत्या. पक्षातील संधिसाधूंना त्या ओळखून होत्या. त्यांनी वेळीच नव्या लोकांना समोर केले व पक्ष उभारला. आज आपण हे करू शकतो का, हा मुख्य प्रश्न आहे. ज्या वर्गाचा काँग्रेसवर ताबा आहे ते यातील काहीच करू देणार नाही, हीच मुख्य अडचण आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: The challenge of the RSS, not the Congress, but the RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.