विखे यांच्या निवडीला आव्हान
By admin | Published: March 31, 2017 03:51 AM2017-03-31T03:51:13+5:302017-03-31T03:51:13+5:30
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या निवडीला
अहमदनगर : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या निवडीला त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले आहे. पदाधिकारी निवडीला आव्हान देतानाच नवनिर्वाचित विश्वस्तांच्या कारभाराला स्थगिती मिळण्यासाठीचा अर्जही त्यांनी दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणात सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने राधाकृष्ण विखे व इतर दोन विश्वस्तांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.
राधाकृष्ण विखे यांची गत महिन्यात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीस त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी हरकत
घेतली आहे. ही निवड बेकायदेशीर असल्याचा त्यांचा आरोप आहे. नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दबावाखाली येऊन विश्वस्तांनी दाखल केलेल्या चेंज रिपोर्टला
तत्काळ मान्यता दिली. मात्र, त्याचवेळी आपण अडीच वर्षापूर्वी दाखल केलेल्या चेंज रिपोर्टवर निर्णय घेतला गेला नाही, असे अशोक
विखे यांचे म्हणणे आहे. या अपिलावर १२ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
नवीन विश्वस्तांच्या कामकाजाला स्थगिती मिळावी यासाठीचा अर्जही अशोक विखे यांनी दाखल केला आहे. त्यावरही १२ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात राधाकृष्ण विखे यांसह अण्णासाहेब म्हस्के व आबासाहेब खर्डे यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)