मराठवाड्यातील २ हजार पुलांच्या स्ट्रक्चर आॅडिटचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:58 AM2018-06-27T06:58:42+5:302018-06-27T06:58:56+5:30
२०१६ पासून विभागातील धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार पुलांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागासमोर निर्माण झाले आहे. मंत्रालयातून वारंवार आदेश देऊनही प्रादेशिक विभागाने स्ट्रक्चर आॅडिट केले नाही.
शनिवारी सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीवरील उपळी-पळशी या गावांना जोडणारा पूल पावसामुळे खचल्यानंतर जिल्ह्यासह मराठवाड्यातील पुलांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकाम विभागाने व जिल्हा परिषदेने बांधलेल्या पुलांचे आॅडिट आॅगस्ट २०१६ पासून रखडले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्व मिळून ३०० लहान-मोठे पूल आहेत. त्यानुसार मराठवाड्यात २ हजारांच्या आसपास पूल असण्याची शक्यता बांधकाम विभाग सूत्रांनी वर्तविली आहे. यामध्ये दगडी आणि अलीकडच्या काळात बांधलेल्या पुलांचा समावेश आहे. २०० ते १००० मीटरच्या अंतरातील पुलांच्या तपासणीचे अधिकार श्रेणीनिहाय अभियंत्यांवर देण्यात आलेले आहेत. ७६ तालुक्यांत बांधकाम विभागाचे सुमारे ६५ उपविभाग आहेत. विभागात किती पूल आहेत, याचा आकडा बांधकाम विभागाकडे नसून २ हजार पूल असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर मराठवाड्यातील पुलांचे आॅडिट करण्यात आले. मराठवाड्यात ८१ जुने पूल आढळून आले. परंतु त्या पुलांचे आॅडिट तांत्रिकदृष्ट्या अर्धवट राहिले. मनुष्यबळ नसल्यामुळे पूर्ण पुलांचे आॅडिट करणे शक्य नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
धोकादायक सहा पूल
प्रभारी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, सिल्लोडमधील पूल जि.प.ने बांधलेला होता. विभागातील काही पूल एनएचएआयकडे वर्ग झाले आहेत. काही पुलांची कामे मंजूर झाली आहेत. जे पूल धोकादायक आहेत, त्यांचे स्ट्रक्चर आॅडिट केले आहे. असे ६ पूल असून, त्यांचे काम लवकरच सुरू होईल.