तिघांच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान
By admin | Published: March 4, 2016 03:02 AM2016-03-04T03:02:55+5:302016-03-04T03:02:55+5:30
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला
जितेंद्र कालेकर, ठाणे
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्याबाबतची परवानगी गुरुवारी राज्याच्या विधी विभागाने ठाणे पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी सर्वात आधी सशर्त जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या जामिनाला यापूर्वीच उच्च न्यायालयात ठाणे पोलिसांनी आव्हान दिले आहे. मुल्ला यांची ठाण्याचे विशेष जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्यानंतर उर्वरित तिघे नगरसेवकही सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु विशेष सरकारी वकील गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली होती. या तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या दिवशीच मुल्ला यांच्या जामिनाला पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर, ७८ दिवसांनी तिघांचीही जामिनावर सुटका झाली.
याचा तपास अद्याप अपूर्ण आहे, तसेच यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. चौघेही आरोपी जामिनावर सुटल्यास या गंभीर प्रकरणातील साक्षीदार, पालिकेचे अधिकारी आदींवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही नगरसेवक भूमिगत झाले होते. त्यांचे मोबाइल नॉट रिचेबल होते. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, या कलमासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे चौघांच्याही संपत्तीची चौकशी सुरू आहे. नगरसेवक झाल्यापासूनची त्यांची बँक खाती पडताळण्यात येत आहेत, असे अनेक मुद्दे जामिनाला आक्षेप घेताना सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या पथकाने मांडले.