मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान
By admin | Published: January 21, 2017 12:39 AM2017-01-21T00:39:29+5:302017-01-21T00:39:29+5:30
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत
योगेश पांडे,
नागपूर- आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगर परिषद निवडणुकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेला ‘विदर्भ राज्य आघाडी’ हे केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन निवडणुकांत उतरणार आहेत. शहरातील काही जागांवर हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भवाद्यांची मते दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पेचातून मार्ग कसा काढायचा याबाबत पक्षांमध्ये विचार सुरू आहे. एरवी दर निवडणुकांत विविध पक्षांकडून प्रचारात विदर्भाचा मुद्दा असतो. मात्र गेल्या काही काळापासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. यंदा केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन राजकुमार तिरपुडे यांचा ‘विदर्भ माझा’ व अणे यांची ‘विरा’ निवडणुकांत उतरणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला परत ऐरणीवर आणणारे अॅड. श्रीहरी अणे हे स्वत: प्रचारात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विरा’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दुसरीकडे काटोल नगर परिषदेवर विजयाचा झेंडा फडकविणारा ‘विदर्भ माझा’ पक्षदेखील चांगलाच चर्चेत आहे. ‘विदर्भ माझा’कडूनदेखील नागपूर मनपा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशा स्थितीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्यास विदर्भवादी मतदारांची मते दुभंगण्याची शक्यता आहे. असे झाले तर दोन्ही पक्षांचे नुकसानच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता दोन्ही पक्षांमध्ये समन्वय सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याने निवडणुकांत काय होणार, हा प्रश्न कायम आहे.
>तिरपुडे म्हणतात, जो जिता वही सिकंदर
यासंदर्भात ‘विदर्भ माझा’चे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या नावावर अनेक पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र राजकीय आखाड्यात जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. विदर्भवाद्यांची मते दुभंगतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे ‘विरा’चे अध्यक्ष रवी संन्याल यांनी मात्र ‘विदर्भ माझा’सोबत समन्वय साधणार असल्याचे सांगितले. नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढेल हे सांगता येत नाही. मात्र विदर्भवाद्यांची मते फुटू नयेत यासाठी आम्ही अणे यांच्या नेतृत्वात पुढाकार घेऊ. एकमेकांना फटका बसू नये अशी रूपरेषा तयार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
>विदर्भवादी पक्षांची मोट बांधणार कशी?
मनपा निवडणुकांत सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा ‘विदर्भ माझा’तर्फे अगोदरच करण्यात आली आहे. त्यांनी आठ उमेदवार घोषितही केले आहेत.
दुसरीकडे सद्य:स्थितीत ‘विरा’ने केवळ एकाच प्रभागात उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे. लहानमोठ्या १८ विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्याचे अणे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यामुळे नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढणार हे निश्चित झालेले नाही. मात्र ही मोट बांधणार कशी, हा प्रश्नदेखील अनुत्तरितच आहे.