आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

By admin | Published: October 5, 2016 05:36 AM2016-10-05T05:36:32+5:302016-10-05T05:36:32+5:30

येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल

Challenge water reservoir | आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

Next

पुणे : येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल. सध्या अस्तित्वात असलेले जलस्रोत टिकविणे आव्हानात्मक असणार आहे. हे जलस्रोत शाश्वत करण्यासाठी नवीन व्यवस्थापन धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी येथे केले.
खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय जलस्रोत विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. अमरजित सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. सी. अग्रवाल, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा व्यासपीठावर उपस्थित होते. टपाल विभागाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’वर काढलेले तिकीट, तसेच संस्थेवरील कॉफी टेबल बुक आणि सरदार सरोवर प्रकल्पावरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
देशाला विविध घटकांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून अन्सारी म्हणाले की, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करण्याचे आव्हान आहे. अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी जलपुनर्प्रक्रियेतील अल्प गुंतवणूक आणि भूगर्भातील पाण्याचा होत असलेला बेसुमार उपसा, यामुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. देशातील अनेक नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी.
पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवत जलसंचय, जलसिंचन, ऊर्जा निर्मिती करता येईल, अशा प्रकारच्या धरणांची रचना तयार करण्याचे आव्हान असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Challenge water reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.