मुले चोरणाऱ्या टोळीचे मुंबई पोलिसांसमोर आव्हान
By Admin | Published: May 2, 2016 12:08 AM2016-05-02T00:08:05+5:302016-05-02T00:08:05+5:30
नागपाड्यातून बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोघींची वाराणसीतून सुटका झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून यामागे मुल चोरणारी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक
- मनीषा म्हात्रे, मुंबई
नागपाड्यातून बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोघींची वाराणसीतून सुटका झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून यामागे मुल चोरणारी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीकडे यातील आणखी एक ४ वर्षीय गुलफाम ताब्यात आहे. त्यामुळे या टोळीचे रॅकेट उध्वस्त करत गुलफामची सुखरुप सुटका करणे पोलिसांसमोर आवाहन बनले आहे.
नागपाडा नयानगर येथून २४ एप्रिल रोजी अचानक गायब झालेल्या तरन्नुम कासुल (६), कुलसूम जुबेर खान (६) आणि गुलफाम कासुल(४) या चिमुकल्यांमुळे मुंबई हळहळली. सहा दिवसानंतर यातील दोघी वाराणसीत सापडल्याची माहिती मिळताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी दोन्ही मुलींना ताब्यात घेत नागपाडा पोलीसांसह त्यांचे नातेवाईक मुंबईच्या दिशेने निघाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत या दोघींही त्यांच्या घरी पोहचणार आहेत.या प्रवासादरम्यान या चिमुकल्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.
२४ एप्रिल रोजी खेळत असताना दोन महिलांनी त्यांना चॉकलेट आणि आईस्क्रिमचे अमिष दाखवून जवळ बोलावले. त्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका टॅक्सीमधून या चिमुकल्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना आणखी खाऊ देण्याचे अमिष दाखवून मुंबईतल्याएका खोलीत डांबून ठेवले. दोन दिवस उपाशीपोटी असलेल्या या चिमुकल्यांना दोघी महिला आणि पुरुषाकडून मारहाण होत होती. त्यात रडल्यास ठार मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हे चिमुकले आणखीनच धास्तावले होते. आंटी हमे घर जाना है... हमे छोड दो... चिमुकल्यांकडून होत असलेल्या आकांताकडेही तिघेही दुर्लक्ष करत होते. अशी माहिती मुलीने सांगितल्याचे कुलसुमचे वडील जुबेर खान लोकमतशी बोलताना दिली.
दोन दिवस खोलीत डांबून ठेवल्यानंतर २६एप्रिल रोजी या तिघांना टे्रनने बनारस येथे नेण्यात आले. तेव्हा या टोळीतील दोन महिला आणि पुरुष त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुलांसोबत वाराणसीत पोहचले. मात्र त्यावेळेस तिघांनीही आरोपींसोबत जाण्यास नकार देत रडून रडून गोंधळ घातला. नागरीक जमताहेत हे पाहून तिघेही जण ४ वर्षीय गुलफामला घेऊन तेथून निसटले. तेथे धडकलेल्या पोलिसांमुळे मुलींची यातून सुटका झाली.
वाराणसीमध्ये या मुलांचा सौदा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या तावडीतून पोलीस गुलफामची सुटका कशी करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या टोळीच्या अटकेतून खुप मोठे रॅकेट उध्वस्त होण्याची शक्यता आहे.
तुम घर जाओ हम आते है....
व्हायएमसी मैदानाच्या दिशेने निघतेवेळी कुलसुमचा ४ वर्षीय भाऊ अकबरअलीही तिच्या मागे लागला होता. मात्र तुम घर जाऊ हम आते है... असे सांगून तिने त्याला घरी धाडल्याची माहिती कुलसुमची आई नाजनीने दिली. त्यामुळे तो तरी यातून बचावल्याचे खान कुटुंबियांचे म्हणणे आहे.
कुर्ल्यात डांबून ठेवल्याची शक्यता
मंगळवारी रात्री कुर्ला येथून एका इसमाने फोन करुन तिघे मुले कुर्ला एलबीएस येथे दिसल्याची माहिती दिली. त्यानुसार तपास पथकाने सकाळपासून कुर्ला परीसर पिंजून काढला.
दरम्यान त्यांची काहीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे या तिघांना कुर्ला येथील खोलीत डांबून ठेवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.