कोराडी संच विक्रीला कोर्टात आव्हान
By Admin | Published: June 18, 2017 12:21 AM2017-06-18T00:21:29+5:302017-06-18T00:21:29+5:30
लोकमत’ला नव्याने मिळालेल्या कागदपत्रांनुसार महाजनकोने कोराडीचे चार निकामी संच ज्या लिलावात मातीमोल किमतीला विकले त्या लिलावाला सिव्हिल जज
- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत’ला नव्याने मिळालेल्या कागदपत्रांनुसार महाजनकोने कोराडीचे चार निकामी संच ज्या लिलावात मातीमोल किमतीला विकले त्या लिलावाला सिव्हिल जज (सिनिअर डिव्हिजन) यांच्या कोर्टात आव्हान दिले गेले आहे.
ही याचिका पुण्याच्या सतीश सेठिया या बड्या ठेकेदाराने दाखल केली आहे व त्यात आॅनलाइन लिलाव रद्द करावा व केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाजनकोने सनविजय रिरोलिंग इंजिनीअरिंग वर्क्सला संच तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. ही याचिका ९ मार्च २०१७ रोजी दाखल झाली असून पुढील सुनावणी २९ जून रोजी आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, यावरील सुनावण्या सुरू असतानाच महाजनकोने संच क्र. १ तोडण्याची परवानगी सनविजय रिरोलिंगला २७ एप्रिल २०१७ रोजी दिली आहे. याचबरोबर महाजनकोने ११ जून २०१७ रोजी जो खुलासा ‘लोकमत’कडे पाठविला त्यात या केसचा उल्लेखच नाही, यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ झाले आहे. महाजनकोच्या १०० कोटी मालमत्ता व तेवढीच वार्षिक उलाढाल या पात्रता निकषाला आव्हान दिले आहे. शिवाय महाजनकोने जानेवारी २०१६मध्ये याच संचाचा लिलावाचा प्रयत्न केला असता सरकारी किंमत १२५ कोटी ठेवल्याचा उल्लेख करून १० महिन्यांनंतर हे संच ६०.६० कोटीत विकले याबद्दल संशय व्यक्त केला आहे व लिलाव रद्द करण्याची मागणी सेठिया यांनी आपल्या याचिकेत केली आहे. पुण्याहून ‘लोकमत’शी बोलताना सेठिया यांनी या सर्व मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. २०१३मध्ये महाजनकोने परळीचे दोन संच विक्रीला काढले होते. त्या वेळी आम्ही २१.१४ कोटींची बोली लावली. ती नाकारून महाजनकोने हे संच फेरलिलावात १५.८० कोटीत विकले, अशी माहिती दिली. मुख्य जनसंपर्क अधिकारी महेश आफळे म्हणाले, ‘‘लोकमत’ला पाठविलेल्या खुलाशात अनवधानाने ही बाब नमूद करावयाची राहून गेली.’ मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी सांगितले की, कोर्टाने या प्रकरणात कुठलाही स्थगनादेश दिला नव्हता.
‘लोकमत’च्या वृत्ताला दुजोरा
या केसमुळे ‘लोकमत’च्या ‘महाजनको कोराडीचे चार संच मातीमोल किमतीत विकले गेले’ या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे़