निवडणुकीत पैशाचे बळ, समाज माध्यमांचा वाढता दुरुपयोग थांबविण्याचं आव्हान- सहारिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:58 PM2018-09-27T15:58:29+5:302018-09-27T15:58:47+5:30
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
ठाणे : सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई महापालिका येथील ज्ञान केंद्र सभागृहात आयोजित कोकण विभागीय कार्यशाळेस संबोधित करीत होते. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.
निवडणूक आयुक्त सहारिया याप्रसंगी म्हणाले की, ७४ व्या घटना दुरुस्तीत संस्थानिक स्वराज्य संस्थाना संवैधानिक दर्जा देण्यात आला असून, दर ५ वर्षांनी निवडणुका घेतल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला असून, त्याला भारत निवडणूक आयोगासारखेच अधिकार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. प्रसंगी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक विषयक बाबींचे उल्लंघन केले तर आयोग कारवाई करू शकतो.
मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्च
मतदानाचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे, मात्र महाराष्ट्रात ते साधारणपणे स्थिर आढळते. महापालिका निवडणुकीत ५० ते ६० टक्के, जिल्हा परिषद निवडणुकीत ६० ते ७० टक्के, ग्रामपंचायत निवडणुकात ७० टक्के असे चित्र दिसते. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अधिक शिकलेल्या मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, त्यांचे मतदान वाढले पाहिजे, असे सांगून निवडणूक आयुक्तांनी पैशाच्या बळाचा आणि समाज माध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला तेव्हा निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्च करतात.
उमेदवारी अर्ज बिनचूक झाले
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह हवे असेल तर नोंदणीची पद्धत सुरू केली, खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे, आश्वासनाचा जाहीरनामा तसेच केलेली कामे जनतेसमोर ठेवणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे, यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण १ टक्क्यावर आले, अशी माहिती सहारिया यांनी दिली.
विद्यापीठाच्या पातळीवर जागरूकता
विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदार नोंदणी केली नसल्यास ती करेन असे लिहून देणे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाना भेटी देणे, याविषयीही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून तरुण पिढीत निवडणुका आणि मतदान याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशीही माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही कार्यशाळा घेण्यामागची भूमिका सांगितली. निवडणूक यंत्रणेचे बळकटीकरण करणे आणि लोकसहभाग वाढविणे यासाठी आयोग गांभीर्याने प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले. मतदार जागृतीसाठी पंधरवडाही पाळण्यात आल्याचे ते म्हणाले. एखाद्या चांगल्या गोष्टी घडत असतील तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे कामही काही मंडळी करतात याचेही उदाहरण देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष करून निवडणूक विषयक यंत्रणा बळकट करावी असे आवाहन केले.
यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी, महापौर जयवंत सुतार, महानगरपालिका आयुक्त रामस्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.