माजी माहिती आयुक्तांच्या जामीन अर्जाला आव्हान
By admin | Published: June 11, 2017 01:12 AM2017-06-11T01:12:06+5:302017-06-11T01:12:06+5:30
आंबेडकर भवनाचे विश्वस्त असल्याचा दावा करणारे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व अन्य सहा जणांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंबेडकर भवनाचे विश्वस्त असल्याचा दावा करणारे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व अन्य सहा जणांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे.
न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. खंडपीठाने गायकवाडांसह सर्व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये दोन भूखंड खरेदी केले. त्यापैकी एका भूखंडावर प्रिंटिंग प्रेस सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचा मुलगा यशवंत आंबेडकर (प्रकाश आंबेडकरांचे वडील) यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकर या प्रिंटिंग प्रेसचे मालक आहेत. तर १९४५ मध्ये डॉ. आंबेडकरांनी दुसरा भूखंड ट्रस्टच्या नावे केला. या दुसऱ्या भूखंडावरच आंबेडकर भवन व अन्य दोन बांधकामे बांधण्यात आली.
गायकवाड व अन्य जणांनी कसे राजकारण खेळून आंबेडकर भवन व अन्य बांधकामे पाडली, हे सर्व याचिकेद्वारे निदर्शनास आणले आहे. या सर्वांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र सत्र न्यायालयाने या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकर यांनी याचिकेत केली आहे.