मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं महागात, राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा; मुक्काम पोस्ट कारागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:51 AM2022-04-25T06:51:19+5:302022-04-25T08:39:55+5:30
सरकारी वकिलांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली तर राणांचे वकील अँड. रिझवान मर्चंट यांनी त्याला विरोध केला.
मुंबई – खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांना रविवारी वांद्रे येथील सुटीकालीन न्यायालयात हजर केले. राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
सरकारी वकिलांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली तर राणांचे वकील अँड. रिझवान मर्चंट यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर कोर्टाने दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सुटीकालीन न्यायालयाने जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे दोघांनाही कोठडीत जावं लागले आहे. रवी राणा तळोजा तर नवनीत राणा भायखळा कोठडीत पाठवले आहे. या दोघांचीही वैद्यकीय आणि कोरोना चाचणी करण्यात आली.
राजद्रोहाचा गुन्हा का?
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिले होते. १४९ अंतर्गत नोटीस बजावत शांतता ठेवण्यास सांगून परत जाण्यास सांगितले होते. मात्र त्या नोटीसला न जुमानता सरकारला आव्हान दिले. त्यामुळे १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर आम्हाला फाशी द्या
उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले. हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की, हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या अशी मागणी नवनीत राणा यांनी केल आहे.