चंबळचं खोरं... ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्य सैनिकांचं ‘जन्मस्थान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 12:38 AM2017-05-21T00:38:04+5:302017-05-21T00:38:04+5:30

1857च्या स्वातंत्र्यसमराला १६० वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढ्याचं एक जाज्वल्य स्मरण..

Chambal Kharane ... not the 'Dakuun Sanctuary', the 'birthplace of freedom fighters'! | चंबळचं खोरं... ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्य सैनिकांचं ‘जन्मस्थान’!

चंबळचं खोरं... ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्य सैनिकांचं ‘जन्मस्थान’!

Next

- समीर मराठे

1857च्या स्वातंत्र्यसमराला १६० वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढ्याचं एक जाज्वल्य स्मरण..

डाकूंचं अभयारण्य म्हणून आजही कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरेतल्या चंबळच्या खोऱ्याची प्रतिमा तशी नकारात्मकच आहे, भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध मानल्या जाणाऱ्या १८५७च्या स्वातंत्र्यसमरात याच खोऱ्यानं सर्वाधिक क्रांतिकारक दिले. देशभरात इंग्रजांनी क्रांतिकारकांची मुस्कटदाबी सुरू केल्यानंतर येथील क्रांतिकारकांनी इंग्रजांना कित्येक वर्षं सळो की पळो करुन त्यांच्या नाकात दम आणला होता. २५ मे १८५७ला शेकडो क्रांतिकारक येथे एकत्र आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची तुतारी फुंकली होती.. या घटनेला २५ मे रोजी १६० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आता एक वेगळी ‘जनसंसद’ बसणार आहे. चंबळच्या खोऱ्यातील समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्यात होणार आहे.
एक दशकापेक्षाही अधिक काळ ऐतिहासिक दस्तावेजांसाठी चित्रफिती तयार करणारे, खोऱ्यात सायकलवरुन तब्बल २,३०० किलोमीटर प्रवास केलेले सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी या जनसंसदेचं आयोजन केलं आहे.
चंबळच्या खोऱ्यात ‘पचनद’; पाच नद्यांचा संगम होणाऱ्या ठिकाणी, हजारो क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध ‘जंग’ सुरू केली होती तेथे हा कार्यक्रम होणार आहे. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कार्यकर्ते, नागरिक त्यास उपस्थित राहणार आहेत. या खोऱ्याची ऐतिहासिक महती लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी आणि येथील समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांमधून प्रत्येक विभागासाठी काही प्रतिनिधी (‘सांसद’) निवडले जातील ते स्थानिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमा या जंगलाला लागून आहेत. या भागातील हजारो घरांचे मागचे दरवाजे आजही ‘बिहड’मध्ये (जंगलात) उघडतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि मातीच्या डोंगरातील चक्रव्युहाच्या रचनेमुळे या भागात लपलेल्या लोकांना पुन्हा शोधून काढणं फारच मुश्कील. शिवाय या भागात पायीच फिरावं लागतं. घोडे वगैरे येथे चालू शकत नाहीत. इंग्रजांनी देशभरात क्रांतिकारकांना पकडून तुरुंगात टाकलं, चंबळच्या खोऱ्यात मात्र त्यांनी हात टेकले. १८५७ला सुरू झालेली ही लढाई क्रांतिकारक तब्बल १८७२पर्यंत लढत होते.

सामाजिक कार्यकर्ते शाह आलम हे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, चंबळच्या या घाटीला ‘नर्सरी आॅफ सोल्जर्स’ म्हटलं जातं. जगातलं सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन, लढाई म्हणूनही इथल्या लढ्याची इतिहासात नोंद झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेतही सर्वाधिक तरुण याच खोऱ्यातील होते. हा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचं, इथल्या गरीब, फाटक्या लोकांच्या समस्यांना हात घालण्यासाठी ही जनसंसद होत आहे.

Web Title: Chambal Kharane ... not the 'Dakuun Sanctuary', the 'birthplace of freedom fighters'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.