जेजुरी गडावर धार्मिक वातावरणात चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 07:15 PM2017-11-19T19:15:05+5:302017-11-19T19:15:35+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला.
जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी करवीरपिठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा रविवारी सकाळचे सुमारास मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करून नवीन पोशाख परिधान करण्यात आला. देवसंस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे अलंकार परिधान करण्यात आले. तत्पूर्वी पुणे येथील भाविक जगताप, नाईक व गोवेकर यांच्या वतीने मुख्य मंदिर, गाभारा, व घटस्थापना स्थळ (बालद्वारी ) आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. तर येवला येथील कापसे या भाविकांनी अर्पण केलेली पैठणी म्हाळसादेवी, बाणाईदेवी मूर्तींना परिधान करण्यात आली. मुख्य मंदिरातील पाकाळणी, पूजा अभिषेक विधीनंतर अलंकाराने मढविलेल्या उत्सवमूर्ती सनई -चौघड्याच्या वाद्यांमध्ये मुख्य मंदीरला प्रदक्षिणा घालत रंगमहाल बालद्वारी येथे आणण्यात आल्या. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, यांच्या मंत्रपठणाने करवीरपिठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजी कचरे यांचे हस्ते विधिवत धार्मिक विधी करीत घटस्थापना करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, कृष्णा कुदळे, अनिल बारभाई, हरिभाऊ लांघी, हनुमंत लांघी, बापू सातभाई, प्रशांत सातभाई, रमेश राऊत, रवी बारभाई, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त वसंत नाझीरकर, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, आदींसह समस्त पुजारी-सेवेकरी,खांदेकरी-मानकरी, देवसंस्थान कर्मचारी अधिकारी, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने राज्यातून आलेले भाविक उपस्थित होत.
कार्यक्रमाचे आयोजन जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, पुजारी-सेवेकरी, खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळ, मार्तंड देवसंस्थान विश्वस्त यांच्या वतीने करण्यात येत आहे. पुढील सहा दिवस दुपारी १२ ते ५ या वेळेत महाप्रसाद अन्नदानासह गडकोट आवारात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंदिर गाभाºयाची विविध आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येणार आहे. मुख्य मंदिरांसह गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.