Balasahebs Assistant Champa Singh Thapa : बाळासाहेबांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:14 PM2022-09-26T17:14:22+5:302022-09-26T18:18:59+5:30
Balasahebs Assistant Champa singh Thapa And CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा (Balasahebs Assistant Champa singh Thapa) यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.#ChampasinghThapa#Shivsena#EknathShindepic.twitter.com/16G4g70rZp
— Lokmat (@lokmat) September 26, 2022
नवरात्रीच्या निमित्ताने थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी थापा यांचं स्वागत केलं आहे. थापा यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच जे काही सुरू होतं ते योग्य नसल्याने त्यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.