राज्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह गारपीटची शक्यता : मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:59 PM2020-03-24T18:59:16+5:302020-03-24T18:59:46+5:30
राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपि यांनी सांगितले की, दक्षिण तामिळनाडु ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत उंच भागात चक्रवाती हवा वाहत आहे. ही हवा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प आपल्याकडे खेचून घेत आहे. त्याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसात तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक अस्थिर वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.
इशारा
२५ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट व सोसायट्या वार्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२६ मार्च : विदभाृत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
२७ व २८ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
़़़़़़़
राज्यात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, २५ ते २८ मार्च या काळात रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सांगली येथे २५ व २६ मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी व शनिवारी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात बुधवारपासून पुढे ६ दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुणे शहरात ३० मार्चपर्यंत आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.