राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता; आंध्रजवळ कमी दाबाचे क्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:33 AM2020-10-19T03:33:14+5:302020-10-19T07:04:55+5:30
अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. (heavy rains)
पुणे : अरबी समुद्रात नव्याने तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने सरकल्याने राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे तेलंगणासह तामिळनाडु, पॉंडेचरी, अंदमान, आंध्र प्रदेशात पुढील ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासात ते आणखी विकसित होण्याची शक्यता आहे.