महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:15 AM2024-05-10T05:15:18+5:302024-05-10T05:15:52+5:30
Rain in Maharashtra: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेची लाट जाणवणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत असून, त्यानुसार पुढील काही दिवस राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाटयाच्या वा-यासह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊस पडेल. तर मुंबईत आकाश अंशत ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहील.
संपूर्ण महाराष्ट्रात १६ मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेची लाट जाणवणार नाही.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
मुंबईत पाऊस
११ ते १५ मे दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, कल्याण, कर्जत, उल्हासनगर, नवी मुंबई परिसरात पाऊस पडेल.
- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक