कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:40 PM2019-12-21T20:40:47+5:302019-12-21T20:46:09+5:30
ख्रिसमसला थंडीचे प्रमाण असणार कमी
पुणे : बंगालच्या उपसागर व लगतच्या क्षेत्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने रविवार व सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे़. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. चंद्रपूर वगळता राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणचे किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविले गेले आहे़.
मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणच्या तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़. कोकणातील तापमानात २ ते ३ अंश तर विदर्भातील किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़.
२२ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़.
२३ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ .कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़.
२४ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २५ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़.
़़़़़़़़़़
राज्यात २२ ते २५ डिसेंबर दरम्यान विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ पुणे, सातारा, नाशिक या तीन जिल्ह्यात २२ ते २५ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता आहे़. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील चार जिल्ह्यात २२ डिसेंबरला पावसाची शक्यता आहे़. औरंगाबाद, अहमदनगर येथे २२ व २३ डिसेंबर तसेच धुळे, जळगाव जिल्ह्यात २३ व २४ डिसेंबर आणि नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता आहे़.
़़़़़़़़़़
पुण्यात ५ दिवस अत्यल्प पावसाची शक्यता
कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे घालून मध्यरात्री ख्रिसमस सण साजरा केला जातो़. पण, यंदा २५ डिसेंबरच्या रात्री दमट हवामानामुळे थंडीचे प्रमाण कमी असणार आहे़. पुण्यात शनिवारी १५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे़.
पुण्यात २२ ते २७ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. रविवारी किमान तापमान १७ अंश तर, सोमवारी १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे़. २२ ते २६ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून अत्यल्प स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.