पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 08:31 PM2017-11-19T20:31:11+5:302017-11-19T20:31:37+5:30
पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : अरबी समुद्रात मालदीव ते दक्षिण कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे तयार झालेले कुंड रविवारीही कायम होते़ त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून, पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
रविवारी राज्यात अनेक ठिकाणी आकाश ढगाळ होते़ सोलापूर जिल्ह्यातील काही गावात हलक्या पावसाच्या सरी आल्या़ रविवारी पुणे शहरात दिवसभर आकाश ढगाळ होते़ त्यामुळे दिवसाच्या तापमानातही वाढ झाली़ किमान तापमान१४़५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे़ पुढील तीन दिवस शहराच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २१ व २२ नोव्हेंबरला दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे 14,5, मुंबई 22,5, सांताक्रुझ 18,5, अलिबाग 21, रत्नागिरी 22, पणजी 24, डहाणु 20.4, भिरा 18.5, जळगाव 15, कोल्हापूर 22.2, महाबळेश्वर 15.6, मालेगाव 15, नाशिक 13, सातारा 17,4, सोलापूर 20.1, उस्मानाबाद 14.9, औरंगाबाद 18, परभणी 17, नांदेड 19, अकोला 19.9, अमरावती 19.8, बुलढाणा 18.4, ब्रम्हपुरी 18.4, गोंदिया 19.4, नागपूर 18.1, वाशिम 16, वर्धा 18.5, यवतमाळ 21.