'निवार' चक्रीवादळामुळे पाँडेचरीत अतिवृष्टी; राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 07:45 PM2020-11-26T19:45:36+5:302020-11-26T19:51:10+5:30
निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले...
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले आहे. त्यामुळे पाँडेचरीसह तामिळनाडु, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. राज्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले. त्यावेळी वार्याचा वेग ताशी १२० ते १३० किमी इतका होता. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाँडेचरी येथे ३०३, तामबाराम ३१४, कुड्डलुर येथे २८२ मीमी पावसाची नोंद झाली होती. तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पाँडेचरी येथील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
विदर्भात बुधवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सवार्त कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने आता पुन्हा उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढण्यास सुरुवात होऊ लागली आहे. विदर्भातील काही ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घटले आहे.
शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
----
पुण्यात पारा घसरला
गेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हिवाळा असूनही दिवसा उकाडा जाणवत होता. आता पुन्हा तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. असून ते सरासरीइतके आहे. तर कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत १ अंशाने अधिक आहे. शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.