कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा
By admin | Published: August 10, 2016 04:38 AM2016-08-10T04:38:54+5:302016-08-10T04:38:54+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला.
मुंबई /नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी तो स्वीकारला.
विद्यापीठातील कामकाज आणि विशेषत: कंत्राटी कर्मचारी भरतीवरून शासकीय पातळीवरून उडालेले खटके या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीमाना दिल्याचे येत आहे. कुलगुरूंनी मात्र व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.
मुक्त विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश शासनाने देऊनही डॉ. साळुंके यांनी ते मानले नव्हते. उलट ही भरती बेकायदेशीर असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे होते. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून खटके उडल्याची चर्चा आहे. त्यातून कुलगुरूंना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांनी सूचित केल्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. डॉ. साळुंखे यांचा १८ आॅगस्टला कुलगुरूपदावरील शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलवून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
आॅडिट स्पष्ट असल्याचे सांगताना त्यांनी विद्यापीठात अनेक गोंधळ सुरू असल्याचे सांगितल्याचे समजते. विशेषत: काही अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची विद्यापीठात यापूर्वी झालेली भरती आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी हात ठेवल्याचे कळते. याबाबत कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. डॉ. साळुंखेयांनी चौदावे कुलगुरू म्हणून १९ आॅगस्ट २०१४ रोजी कार्यभार स्वीकारला होता. (प्रतिनिधी)