काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या शक्यता वाढल्या
By admin | Published: January 17, 2017 01:22 AM2017-01-17T01:22:42+5:302017-01-17T01:22:42+5:30
दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘आघाडी’च्या विषयावर जोरदार खलबते केली
पुणे : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘आघाडी’च्या विषयावर जोरदार खलबते केली. महापालिका निवडणुकीत उभे राहिलेले भाजपाचे आव्हान परतून लावण्यासाठी आघाडी व्हावी, अशी भूमिका काही जणांकडून व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर या आघाडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरणार असून, त्याचे डॅमेज कंट्रोल कसे करायचे, याचीही चर्चा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भात सोमवारी रात्री नऊ वाजता बैठक घेतली, तर काँग्रेसची बैठक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बंगल्यावर रात्री दहा वाजता सुरू झाली.
दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये आघाडी केल्यामुळे कुठे फायदा होईल, काय नुकसान होईल यावर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत, ते जाणून घेण्यात आले. आघाडीनंतरच्या वेगवेगळ्या समीकरणांवर चर्चा करण्यात आली. आघाडीचा फायदा कुणाला जास्त होईल याचाही अंदाज जाणून घेण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी आघाडी करून लढणे योग्य ठरेल, अशी भावना दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसकडून राष्ट्रवादीला ७१-९१ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामध्ये काँगे्रसला ७१ तर राष्ट्रवादीने ९१ जागा लढवाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रस्तावावर विचार करण्यात येत असून, त्यांच्याकडून ५२-११० जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेस ५२ तर राष्ट्रवादी ९१ जागा लढवेल, असे स्पष्ट करण्यात
आले आहे.